शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने घाई करू नये

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

राज्यातील शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी बार्देशातील बहुतेक शाळा हायस्कूल्स तसेच पालक शिक्षक-संघांनी आज विविध भागात बैठकी घेतल्या. या बैठकीत सरकारकडून घिसाडघाई न करण्याचाच सूर व्यक्त करण्यात आले.

शिवोली: राज्यातील शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी बार्देशातील बहुतेक शाळा हायस्कूल्स तसेच पालक शिक्षक-संघांनी आज विविध भागात बैठकी घेतल्या. या बैठकीत सरकारकडून घिसाडघाई न करण्याचाच सूर व्यक्त करण्यात आले. शुक्रवारी डिचोली तालुक्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, अशा घटना ताज्या असताच सरकार आणि शिक्षण खाते नेमके कोणाच्या भरवशावर शाळा हायस्कूल्स सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला, असा सवाल या बैठकीत पालक वर्गाकडून उपस्थित करण्यात आला. 

तामिळनाडूतील शाळेत शिक्षकासहित सर्वच्या सर्व विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याची बातमी शुक्रवारी वाचनात आली. त्यामुळे यंदाचे शालेय वर्ष सुरू करण्याचा अट्टहास सरकारने सोडून द्यावा, असे शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ व्यक्ती अमृत आगरवाडेकर यांनी सांगितले.
इंग्लंडसारख्या प्रगत देशांतही दुसरी लाट आलेली आहे, त्यामुळे  आपल्या देशात रुग्ण वाढणार नाहीत, याबद्दल ठामपणे कोणी स्पष्ट करीत नाहीत, तेव्हा सरकारने घाई करू नये, असे मत कळंगुट येथील समाज कार्यकर्ते एकनाथ नागवेंकर यांनी सांगितले,

ऑनलाईन देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा तसेच नेटवर्किंग सेवेचा दर्जा सुधारण्यावर सरकारने अधिक लक्ष केंद्रित करण्याचा एक वेगळा विचार आज झालेल्या पालक शिक्षकांच्या बैठकीत मांडण्यात आला. शक्य विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईलची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी बहुतेक पालकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच शाळांचा दर्जा सुधारावा, अशीही पालकांची मागणी आहे.

संबंधित बातम्या