"सरकारने अबकारी कायद्यात बदल केल्यामुळे, गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांवर घाला"

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

गोवा सरकारने अबकारी कायद्यात बदल करून मद्य उद्योगांना काजू फेणी उत्पादन व्यवसायात प्रवेश करण्यास वाट मोकळी करून दिल्यास गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांवर तो घाला ठरेल.

पणजी: गोवा सरकारने अबकारी कायद्यात बदल करून मद्य उद्योगांना काजू फेणी उत्पादन व्यवसायात प्रवेश करण्यास वाट मोकळी करून दिल्यास गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांवर तो घाला ठरेल. या व्यवसायाचे बाजारीकरण होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला 
आहे.  

गोव्याच्या फेणीला वारसा असून, फेणीच्या पारंपरिक उत्पादन प्रक्रियेला एक वैशिष्ट्य आहे. काजूचे फळ गोळा करण्यापासून ते फेणीची भट्टी लावण्याची नावीन्यपूर्ण प्रक्रिया ही एक कला आहे. धनाढ्य मद्य सम्राटांना या व्यवसायात प्रवेश देऊन व्यवसायाचे बाजारीकरण करण्यासाठी सरकारने अबकारी कायद्यात हा बदल करण्याचे प्रयत्न करू नयेत. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत ‘गोंयचे दायज’ ही योजना सुरू करून गोव्यातील पारंपरिक व्यवसाय जपून ठेवण्याचे प्रयत्न कॉंग्रेस सरकारने केले होते.

भाजप सरकार सर्व पारंपरिक व्यावसायिकांवर अन्याय करून धनाढ्य उद्योगपतींचा फायदा बघत आहे असा गंभीर आरोप दिगंबर कामत यांनी करताना या बदलाचे गंभीर परिणाम गोव्यावर होणार आहेत असे ते 
म्हणाले.  wwगोवा काजू फेणी उत्पादक व बोटलर्स असोसिएशनकडे  फेणीची ‘जीआय’ मान्यता असून ही संघटना आज पारंपरिक काजू उत्पादक तसेच काजू फेणी व इतर मद्य उत्पादक यांचे प्रश्‍न सातत्याने मांडत आहे व समस्यांवर तोडगा काढण्यांचा प्रयत्न करीत आहे.

सरकारने या संघटनेला तसेच इतर संबंधितांना विश्वासात घेऊन पुढचे पाऊल टाकावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. गोव्यातील पारंपरिक काजू फेणी उत्पादकांचे हित जपणे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. काजू फेणी उत्पादन व्यवसायाचा वारसा पुढे चालू ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या