'कमिशन खाऊन १ किलो कुजके कांदे देणाऱ्या सरकारने पसरवली दुर्गंधी': महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तीन किलो कांदे देणार म्हणून सांगणाऱ्यांनी एक किलो कुजके कांदे उपलब्ध केले. ते जनतेला नकोसे झाल्याने सोसायटीत दुर्गंधी निर्माण झाली आहे.

कुडचडे :महिला काँग्रेस पक्षाने राज्यात कांदा महागाईवरून गेले अनेक दिवस आंदोलन केले, तरीही सरकारचे डोळे उघडत नाहीत. जनतेची काळजी नसलेले सरकार कमिशन गोळा करण्यात गुंतले आहे. तीन किलो कांदे देणार म्हणून सांगणाऱ्यांनी एक किलो कुजके कांदे उपलब्ध केले. ते जनतेला नकोसे झाल्याने सोसायटीत दुर्गंधी निर्माण झाली आहे.

अशा सरकारचे डोळे उघडण्यासाठी गोव्यातील जनता जिल्हा पंचायत, पालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा करीत असून जनता सरकारच्या डोळ्यात महागाईचे झणझणीत अंजन घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी देतानाच महागाईविरुद्ध सरकारला अद्दल घडवा, असे आवाहन केले. 
तिळमळ येथे महिला काँग्रेसतर्फे स्वस्त दरात कांदा विक्री आंदोलनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत रोशन गावकर, हर्षद गावस देसाई, अभय देसाई, पुष्कल सावंत, अली शेख, लालन, अलिशा शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

हर्षद गावस देसाई म्हणाले, की महामारीत रोजगार नाही, व्यवसाय थंडावले. त्यात महागाईवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने हे सरकार निष्प्रभ झाले आहे. सोसायटीत पुरविण्यात येणारा कांदा निकृष्ट दर्जाचा आहे. कोविड काळात जनतेला सुविधा पुरविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेवर आहे म्हणून काहीही करू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही. काँग्रेस पक्ष कांदे विक्री व्यवहार करण्यासाठी नसून सरकारचे डोळे उघडण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

कुडचडे गट काँग्रेस अध्यक्ष पुष्कल सावंत म्हणाले, की काँग्रेस महिला कांदे विक्री आंदोलनातून राज्यातील महागाईचे दृश्य सरकारपुढे आणत आहे. अनुदान रूपाने कांदा उपलब्ध करणे शक्य असताना सत्तेच्या जोरावर जनतेच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या सरकारच्या डोळ्यातून पाणी काढण्यासाठी जनता प्रतीक्षा करीत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने गरजेच्या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून द्याव्यात.
दक्षिण गोवा काँग्रेस सरचिटणीस अली शेख यांनीही यावेळी सरकारवर टीका केली. यावेळी स्वस्त कांदे खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. प्रत्येकाला पंचवीस रुपये किलोप्रमाणे एकेक किलो कांदे देण्यात आले.

संबंधित बातम्या