शेतकऱ्यांच्‍या विनवण्‍यांकडे सरकारचे सोयीस्‍कर दुर्लक्ष?

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मोप धारगळ शेतकरी संघर्ष समिती मार्फत विविध ठिकाणी बैठका घेऊन शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला होता.

पेडणे : मोप महामार्गासाठी सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. यावेळी सुरवातीला आंदोलनकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्याकडे चर्चा करताना विनायक च्यारी म्‍हणाले, लोकांच्या पोटावर नांगर फिरून जमिनी घेऊ नये. सर्वेक्षण त्वरित थांबवा. आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने मागणी करीत आहोत. सरकारला निवेदने दिली आहेत,  न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असेही त्‍यांनी सांगितले. त्यावर उपजिल्हाधिकारी राविशेखर निपाणीकर यांनी म्‍हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत शेतकऱ्यांची चर्चा झाली आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले, ते पाळण्यात येईल. पीडित शेतकऱ्यांना कायमच्या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. हे सर्वेक्षण कायद्यानुसार केले जात आहे. त्‍यात कुणी अडथळा आणला, तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वेक्षणाला कुणी विरोध करू नये.

आपल्या मागण्या भूसंपादन अधिकारी यांच्याकडे शांततेने मांडा, अशी सूचना केली. मात्र, भूसंपादन अधिकारी तेथे फिरकलाच नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते अधिक संतप्त झाले. आम्ही आमच्या जमिनी देणारच नाही, आम्हाला सरकारी नोकऱ्या नको, या निर्णयावर शेतकरी अखेरपर्यंत ठाम राहिले.सुरवातीला शांत पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्यासमोर मांडल्या. त्यांनीही शांतपणे त्‍या ऐकून घेतल्या. यादरम्यान पोलिसांनी चारही बाजूने आंदोलनकर्त्यांना घेरले होते. आंदोलनकर्ते जोरदार घोषणा देत होते. आम्हाला आमच्या जमिनी द्या आम्हाला नोकऱ्या नको, असे वारंवार सांगत होते.

शेतकऱ्यांचा विरोध डावलून सर्वेक्षण

मोप धारगळ शेतकरी संघर्ष समिती मार्फत विविध ठिकाणी बैठका घेऊन शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला होता. धारगळ ग्रामसभेत मोप महामार्गाच्‍या रस्त्याच्या विरोधात ठराव मंजूरही केला होता. शेतकरी आणि उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्यासोबत एक बैठक नागझर येथे झाली होती. त्यावेळी मंत्री आजगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांनी त्यावेळीही आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, असा निर्धार केला होता. त्यानंतर मोजक्याच शेतकऱ्यांचा एक गट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चेला गेला होता. चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची ग्वाही देताना सर्वेक्षण करताना कुणीही विरोध करू नये, मागण्यांवर विचार केला जाईल, असे सांगितले होते. पण, बहुतांश शेतकऱ्यांना हा तोडगा पसंत पडल नाही. ज्ञानेश्वर वरक या रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या उपस्थितीत शेवटी सर्वेक्षण काम सुरू झाले.

लढा तीव्र होणार 

दरम्यान, हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय म्हापसा पोलिस ठाण्यात आम्हाला अटक करून ठेवलेल्या ठिकाणी केला असून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या सरकारच्या कृत्यांची माहिती देऊन व जनजागृती करून लढा उभारणार असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगितले.

संबंधित बातम्या