'प्रश्‍न उद्यावर ढकलणे हे सरकारचे धोरण' आमदार रोहन खवंटेंचा सरकारवर निशाणा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

कसिनो मांडवीतून इतरत्र हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे.

पणजी: सरकार कोणतेही प्रश्न सोडवू पाहत नाही. त्याचमुळे आजचा प्रश्न सोडवण्याऐवजी तो उद्यावर ढकलण्याचे सरकारचे धोरण दिसते. मांडवी नदीतील कसिनोंना सहा महिन्‍यांची मुदतवाढ देऊन सरकारने ते सिद्ध केले आहे, असे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी 
सांगितले.

ते म्हणाले, मी मंत्रिमंडळात असतानाही कसिनोंना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती, त्यावेळी समांतर पद्धतीने कसिनो कुठे हलवले जाऊ शकतात याची पाहणी सुरू केली होती. आता सरकारची कसिनो इतरत्र हलवण्याची तयारीच दिसत नाही. केवळ मुदतवाढ देऊन सरकार वेळकाढूपणा करत आहे. कसिनो मांडवीतून इतरत्र हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. जनतेच्या भावनांशी सरकार खेळू शकत नाही. विधानसभेत मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी कसिनो इतरत्र हलवू, असे आश्वासन दिले होते त्याची तरी पूर्ती केली पाहिजे. कसिनोंना २७७ कोटी रुपयांचा कर माफ करून सरकारने आपल्‍याला कसिनो किती प्रिय आहेत हे दाखवून दिले आहे.

'शांततावादी निदर्शकांना अटक करणं लोकशाही हक्कांवर हल्ला'

गेल्या ऑक्टोबरमध्ये गेमिंग कमिश्नर नेमू असे सरकारने सांगितले होते त्याचे काय झाले हेही सरकारने सांगावे. २०१२ पासून मी मांडवीतील कसिनो हटवा, अशी मागणी करत आलो आहे. कसिनोंना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. पुढील मुदतवाढ देण्याआधी कसिनो कुठे हलवणार त्याची योजना सरकारने तयार करावी, असे खंवटे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या