भंडारी समाजावर सरकार पक्षाचा सूड

Sudesh Arlekar
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

गोमंतक भंडारी समाजातील नेत्यांवर सरकार पक्षाकडून राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न होत असला तरी आगामी काळात गोव्याच्या राजकारणाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य या समाजामध्ये आहे. त्यामुळे, सामाजिक अंतर राखण्यासंदर्भातील शासकीय नियमाचे पालन करूनही सरकार पक्षाने आरती संग्रहाच्या प्रकाशनाला विरोध करणे योग्य नव्हे, अशी प्रतिक्रिया या ज्ञातीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे.

म्हापसा
समाजाच्या युवा समितीतर्फे गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त काढलेल्या आरतीसंग्रहाचे प्रकाशन म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रगती संकुलात प्रांगणात करण्यात आले असता संयुक्त मामलेदार राजाराम परब व पोलिस उपनिरीक्षक आशिष परब यांनी त्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. उच्च स्तरावरून यासंदर्भातील आदेश आले असून हा कार्यक्रम सभागृहात घेऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे अखेरीस हा कार्यक्रम सभागृहाबाहेर खुल्या जागेत घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री तथा फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक, शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, साळगावचे आमदार जयेश साळगावकर, थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सरकारच्या या धोरणाबाबत तीव्र निषेध वक्त केला. सरकार पक्षातील लोकांना एक नियम आणि इतरांना वेगळा नियम, हे धोरण योग्य नव्हे, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यक्रमांना हा नियम लागू होत नाही का, असा सवाल त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी केला. त्यावेळी ते अधिकारी निरुत्तर झाले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावरील मान्यवर या नात्याने उपस्थित असलेले भाजपचे पदाधिकारी जलस्रोत खात्याचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी त्याबाबत थोडेचे सौम्य धोरण अवलंबले. या विषयासंदर्भात कोणतेही वक्तव्य ठामपणे व्यक्त न करता त्याबाबत मूग गिळून गप्प बसण्याचेच त्यांनी पसंद केले. तरीसुद्धा सरकार पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांच्या सुरात सूर मिळवण्याचा त्यांनी थोडाफार प्रयत्न केला.
गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, महिला विभागाच्या अध्यक्ष शुभांगी गुरुदास वायंगणकर, म्हापशाचे माजी नगराध्यक्ष समाजाचे बार्देश तालुका अध्यक्ष सुधीर कांदोळकर इत्यादींची यावेळी उपस्थिती होती.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या