श्रेष्ठ भारतसाठी योगदान द्या: राज्यपाल कोश्‍यारी

Governor Bhagat Singh Koshyari appealed to every citizen to contribute to a better India
Governor Bhagat Singh Koshyari appealed to every citizen to contribute to a better India

पणजी: सुवर्ण गोवा निर्मितीसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार एक भारत श्रेष्ठ भारतमध्ये प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले. विधानसभेत त्यांनी अभिभाषण केले. त्यांनी सुरवातीची तीन मिनिटे भाषण वाचल्यानंतर उर्वरित भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले त्यात हे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यपालांनी आपल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या गोवा भेटीवेळी राज्यातील समान नागरी कायद्याचा केलेला उल्लेख ही गौरवास्पद बाब असल्याचे नमूद करून म्हटले आहे, की आधार नोंदणीत राज्याला देशात पाचवा तर लाभार्थ्यांना थेट बॅंक खात्यात लाभ देण्यात राज्याला सातवा क्रमांक मिळाला आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार सर्वांगीण विकासात राज्याने देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. यावर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये अबकारी कर संकलन ४९१ कोटी ८० लाख रुपये झाले असून त्यापूर्वीच्या वर्षी ते ४७८ कोटी ४ लाख रुपये होते. या महसुलात २.८७ टक्के वाढ झाली आहे. तीन महिने पूर्णतः टाळेबंदी असतानाही सरकारचा महसूल २९२ कोटी रुपये २२ लाख रुपये वसूल झाला आहे. डिसेंबरपर्यंत ५४७ कोटी ९५ लाख रुपये महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यंदा वस्तू व सेवा कर वसुलीचे लक्ष्य ५ हजार ३९३ कोटी ७७ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. एकरकमी कर फेड योजनेतून २०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. या आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत राज्यातील भाजीपाला उत्पादकांकडून २ कोटी ८५ लाख रुपयांचा भाजीपाला गोवा फलोत्पादन विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला आहे. ९९६ शेतकऱ्यांकडून हा भाजीपाला खरेदी केल्याने ही रक्कम त्यांना थेटपणे मिळाली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात १७ हजार ५९७ टन भाजीपाला व ८२८ टन कडधान्यांची विक्री करण्यात आली आहे.

२०२० मध्ये कामधेनू योजनेंतर्गत ५१६ जनावरांची खरेदी ११२ शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांना ३ कोटी ३७ लाख रुपये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ८२ लाख रुपये प्रोत्साहनपर देण्यात आले आहेत. १११ मच्छीमारांना किसान क्रेडीट कार्डांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी भाषणात दिली आहे. राज्यातील जनतेच्या पर्यावरणाविषयी असलेल्या संवेदनशीलतेचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे, की राज्य सरकारने १ लाख ७५ हजार रोपटी लावली आहेत. २३५.१६ हेक्टरवर ही लागवड केली आहे. तीन महिने चाललेल्या वन महोत्सवात ३ लाख ५७ हजार रोपटी जनतेला मोफत देण्‍यात आली आहेत. साखळीत ग्राम उपवन निर्माण करण्यात आले आहे. राजभवनावर औषधी वाटिका विकसित करण्यात आली आहे. २०० जलसाठ्यांचा विकास राज्यभरात करण्यात आला आहे. राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने १५ हजार ७८० कोटी ५४ लाख रुपये गुंतवणुकीच्या १९६ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यातून ३७ हजार २४७ जणांना रोजगार मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com