राज्‍यपाल आज दिल्ली दौऱ्यावर

अवित बगळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

येत्या ५ रोजी राज्यघटनेतील ३७० वे कलम हटवण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने राज्यपालांचा हा दिल्ली दौरा असला तरी त्याचे सोयीने वेगवेगळे अर्थ मात्र काढण्यात येत आहेत.

पणजी

राज्यपाल सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील सख्ख्याच्या कहाण्या जाहीरपणे चघळल्या जात असतानाच राज्यपाल आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. याचदरम्यान काहींनी राज्यपाल बदलले जाणार, असे ‘पिल्लू’ सोडून दिले आहे. त्याची आज दुपारनंतर समाजमाध्यमावर चर्चा होती.
राज्यपालांचा आजचा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित आहे. त्यानुसार ते दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज्यात परत येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्याचे केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विषयांबाबत केंद्रीय मंत्र्यांना ते आठवण करून देण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट असताना त्यांनी ज्या खंबीरपणे परिस्थिती हाताळली त्यावरून त्यांच्या प्रशासकीय कामगिरीची कल्पना येते. याचमुळे राज्यपाल हे पद घटनात्मक असले, तरी लोकांच्या समस्यांना भिडल्याशिवाय त्याना स्वस्‍थ बसवत नाही. राज्यात लोकनियुक्त सरकार असताना दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली, तर प्रशासन कोंडीत सापडते. त्यांनी अद्याप थेटपणे कारभारात हस्तक्षेप केला नसला तरी सरकारला मला गृहित धरू नका, असा अप्रत्यक्ष इशारा देण्यासही कमी केलेले नाही. येत्या ५ रोजी राज्यघटनेतील ३७० वे कलम हटवण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने राज्यपालांचा हा दिल्ली दौरा असला तरी त्याचे सोयीने वेगवेगळे अर्थ मात्र काढण्यात येत आहेत.

 

संबंधित बातम्या