सरकारचे लक्ष भागीदारीच्‍या प्रकल्‍पांकडे

Avit Bagle
शनिवार, 11 जुलै 2020

पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी विभागाचे पुनरुज्जीवन : सुरेश शानभोगे यांचे संचालकपदी नियुक्ती

पणजी

राज्य सरकारने आता पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी भागीदारीचा आधार घेण्याचे ठरवले आहे. वित्त खात्यातील सार्वजनिक खासगी भागीदारी विभाग आता पुनरुज्जीवीत करण्यात आला असून त्याच्या संचालकपदी मोप विमानतळ प्रकल्प मार्गी लावण्याचा अनुभव असलेल्या सुरेश शानभोगे यांची नियुक्ती केली आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात पर्यटकांसाठी लागणारे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याची सरकारची योजना आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘कोविड’ महामारीच्या काळातच राज्याला आवश्यक असणारे प्रकल्प मागे पडू नयेत, यासाठी या प्रकल्पांना गती देण्याचे ठरवले आहे. आर्थिक पुनरुज्जीवनासाठी शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने या प्रकल्पांसाठी खासगी गुंतवणूकदार पाहण्याची सूचना केली होती. त्यावर काम करताना मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक खासगी भागीदारी विभाग कार्यान्वित करण्याचे ठरवले. याचवेळी त्यांच्यासमोर परिषद केंद्र (कन्वेन्शन सेंटर) प्रकल्प खासगी भागीदारीतून यशस्वीपणे मार्गी लावलेल्या श्री. शानभोगे यांना वर्णी लावण्‍यासाठी प्राधान्‍य देण्‍यात आले. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर सध्या नागरी हवाई वाहतूक संचालकपदी असलेल्या शानभोगे यांची या विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

भानभोगे यांचीच वर्णी का?
मोप आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून साकारत आहे. त्यातून निर्माण होणारा आताचा व प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरचा रोजगार स्थानिकांनाच मिळावा, यासाठी कायदेशीर, लिखीत व्यवस्था शानभोगे यांनी केली आहे. त्यामुळे सरकारने खासगी भागीदारीतून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शानभोगे यांना प्राधान्य दिल्याचे दिसते.

...तर परिषदांच्‍या दिनदर्शिकेत गोव्‍याला स्‍थान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, परिषद केंद्र (कन्वेन्शन सेंटर) उभे करण्यासाठी खासगी गुंतवणुकीची मदत घेतली जाणार आहे. माझ्यासमोर शानभोगे यांनी काही सादरीकरणे याबाबत केली आहेत. यापूर्वी त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला होता. मात्र, न्यायालयीन खटल्यांमुळे तो पुढे सरकला नव्हता. आता तो दोनापावल येथे त्या प्रकल्पासाठी आरक्षित जागेत साकारला जाईल. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमचे केंद्र झाल्यानंतर हा प्रकल्प सरकारने हाती घेण्याचे ठरवले होते. आता तो मार्गी लागणार आहे. यामुळे वर्षभर विविध परिषदांसाठी देश - विदेशातून गोव्याला पसंती मिळू शकेल. सध्या मोठ्या परिषदांच्या आयोजनासाठी राज्यात परिषद केंद्राची उणीव भासते. ती दूर केली की, परिषदांच्या दिनदर्शिकेत गोव्याला स्थान मिळेल. याशिवाय पर्यटनवृद्धीसाठी लागणारे प्रकल्पही सार्वजनिक खासगी भागीदारीतून साकारले जाणार आहेत. त्यात एम्युसमेंट पार्कसारख्या प्रकल्पांचाही समावेश आहे.

बाणावलीतील मत्‍स्‍यपैदास प्रकल्‍पही भागीदारीवर
बाणावली येथील निमखाऱ्या पाण्यातील मत्‍स्यपैदास प्रकल्प सरकारसाठी पांढरा हत्ती सिद्ध झाला आहे. त्या प्रकल्पात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेले मत्स्योद्योग खात्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवताना सरकारवर याआधी मोठा आर्थिक बोजा पडला होता. तो प्रकल्प आता खासगी भागीदारीतून चालवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी ३-४ गुंतवणुकदारांनी तयारी दर्शवली आहे. वित्त खात्यात त्यासंदर्भातील प्राथमिक बैठकही आज झाली आहे. पणजीच्या बसस्थानकाचा विचारही खासगी भागीदारीतून विकासासाठी होऊ शकतो.

प्रकल्‍प सल्लागारासाठी युवा व्‍यावसायिकांकडून देकार
नीती आयोगाच्या धर्तीवर या प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करण्यासाठी युवा व्यावसायिकांकडून देकार मागवण्यात आले आहेत. देकार मागवणे, तत्‍सम कामे आणि निविदा मागवणे, तपासणे, तयार करणे आदी कामांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. या सल्लागारांची यादी सार्वजनिक खासगी भागीदारी विभागात तयार असेल. त्यातून एकेका सल्लागाराकडे एकेक प्रकल्प सोपवला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम करताना सल्लागारास पूर्णवेळ याच प्रकल्पाचे काम करावे लागणार आहे. त्याला इतरत्र काम करता येणार नाही.

संबंधित बातम्या