सरकार घेणार शंभर कोटींचे कर्ज

Dainik Gomantak
रविवार, 10 मे 2020

सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार महसुलाच्या ६८ टक्के खर्च हा वेतन व निवृत्तीवेतनावर केला जातो. त्यामुळे इतर योजना, विकास यासाठी केवळ ३२ टक्केच निधी शिल्लक राहतो.

पणजी

भांडवली खर्च भागवण्यासाठी कर्जरोखे विक्रीतून राज्य सरकार आणखीन शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. मुंबई येथे रिझर्व बॅंक १२ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने या रोख्यांची विक्री करणार आहे.
राज्य सरकार घेत असलेले कर्ज हा टीकेचा विषय झाला आहे. सरकार दैनंदिन खर्चासाठी हे कर्ज घेत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अनेकदा केला आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार महसुलाच्या ६८ टक्के खर्च हा वेतन व निवृत्तीवेतनावर केला जातो. त्यामुळे इतर योजना, विकास यासाठी केवळ ३२ टक्केच निधी शिल्लक राहतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २७ एप्रिल रोजी गोमन्तकला दिलेल्या मुलाखतीत यंदाचा अर्थसंकल्प हा महसुली शिलकीचा असला तरी कोविड १९ टाळेबंदीनंतर तो आता वित्तीय तुटीचा असेल त्याचा अंदाज लावणेही आता कठीण आहे असे नमूद केले आहे.
दरम्यान, महसूल वाढीसाठी राज्य सरकारने आज डिझेलवरील मुल्यवर्धित करात चार टक्के वाढ केली. यामुळे डिझेलचा दर प्रती लीटर २ रुपये ६० पैशाने वाढला. डिझेल आता ६४ रुपये ६६ पैसे झाले आहे.

संबंधित बातम्या