अस्नोडा परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्राची ‘बत्ती गुल’

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

अस्नोडा आणि परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात वारंवार खंडित वीज होत असल्याने या प्रकाराचा अनुभव येथील ग्रामस्थांना पुन्हा पुन्हा येत आहे.

अस्नोडा:  अस्नोडा आणि परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात वारंवार खंडित वीज होत असल्याने या प्रकाराचा अनुभव येथील ग्रामस्थांना पुन्हा पुन्हा येत आहे. विजेच्या सुविधेबाबत वीज खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वीज बिले वेळच्यावेळी अदा करूनही खात्यातर्फे नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

विज खात्याने ग्राहकांना योग्य सुविधा पुरवाव्यात अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. गेल्या महीनाभरापासून या परिसरात विजेचा लपंडाव अखंडपणे सुरू आहे. साधारणपणे सर्वसामान्य नागरिक आपले वीज बिल वेळेवर भरत आलेला आहे. 

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या काळातही खात्याच्या कठीण परिस्थितीतही नागरिकांनी विजेची बिले वेळेवर भरून वीजखात्याला सहकार्य केलेले आहे. टाळेबंदीच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. परंतु त्या काळातही शासनाकडून एखाद दुसरा प्रसंग वगळता वीज पुरवठ्यात शासनाकडून कुचराई झाली नाही. 

अशा परिस्थितीतही आपल्यापरीने खारीच्या वाट्याचे योगदान देताना लोकांनी पाणी, वीज बिले भरून सरकारची बाजू उचलून धरली. परंतु वीजखात्याकडून वारंवार वीज खंडित होण्यामुळे लोकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, वाड्यावाड्यांवर लावण्यात आलेले एलईडी बल्ब अनेक ठिकाणी गेल्यामुळे लोकांना मोठे गैरसोय होत आहे.थिवी आणि डिचोली येथील वीज नियंत्रण कक्षांनी नागरिकांच्या या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. वीज उपकरणांच्या बाबतीत चौकशी करता वीज खात्याने पंचायत क्षेत्रात एलईडी बल्ब साठा पुरवला नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगण्यात येते. 

कोरोच्या संकटामुळे शाळा कॉलेजेस् बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागत आहे. शिक्षण खात्याने विद्यार्थ्या॑च्या सोयीसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना या पद्धतीचा फायदा होतो. मात्र ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या आणि विजेच्या वारंवार लपंडावामुळे होतकरु विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या