व्‍यासंगाची कास धरणारे पं. दिनकरबुवा!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पणशी-पेडणे येथील कला व अध्यात्मशास्त्राची थोर परंपरा असलेल्या पणशीकर कुटुंबातील पंडित दिनकरबुवा हे संगीत रत्न. अध्यात्मप्रचुर विद्वान वक्ते तथा थोर लेखक, विचारवंत पं. दाजीशास्त्री पणशीकर, नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांचे ते धाकटे बंधू व प्रसिद्ध युवा गायक व सतारवादक भूपाल पणशीकर व तबलावादक शंतनू पणशीकर यांचे वडील होत. 

पणजी : पणशी-पेडणे येथील कला व अध्यात्मशास्त्राची थोर परंपरा असलेल्या पणशीकर कुटुंबातील पंडित दिनकरबुवा हे संगीत रत्न. अध्यात्मप्रचुर विद्वान वक्ते तथा थोर लेखक, विचारवंत पं. दाजीशास्त्री पणशीकर, नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांचे ते धाकटे बंधू व प्रसिद्ध युवा गायक व सतारवादक भूपाल पणशीकर व तबलावादक शंतनू पणशीकर यांचे वडील होत. 

३० जानेवारी १९३६ साली त्यांचा मुंबई येथे जन्म झाला. सुरवातीला पाटण- गुजरात येथे त्यांनी दत्तात्रय कुंटे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथे बुजुर्ग गायक पं. सुरेश हळदणकर व पं. वसंतराव कुलकर्णी हे गुरू त्यांना लाभले. कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमीची ज्येष्ठ शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली व तेथे जयपूर घराण्याचे थोर गायक निवृतीबुवा सरनाईक यांच्या तालमीत त्यांची गायकी बहरली. तपश्चर्या आणि व्यासंगाची कास धरून दिनकरबुवांनी स्वतःची वेगळी ओळख हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण केली.गांधर्व महाविद्यालयाची
श्रद्धांजली अर्पण...

पंडित दिनकरबुवा यांनी माणुसकी जपताना शास्त्रीय संगीतात आदराचे स्थान कमावले. त्यामुळेच गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर, सचिव बाळासाहेब सूर्यवंशी आणि ‘प्रबंध परिषदे’च्या सदस्यांनी पं. दिनकर पणशीकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

महत्त्वाचा दुवा हरपला
पं. दिनकरबुवा पणशीकर यांच्या निधनाची बातमी मुंबईतील एका मित्राने कळवली तेव्हा खुप वाईट वाटले. त्यांच्या जाण्याने अभिजात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील महत्वाचा दुवा हरपला आहे. ते जयपूर अत्रौली घराण्याचे उत्तम गायक व गुरू होते. संगीताविषयीची आपली मते भीड-भाड न बाळगता ते ठामपणे मांडायचे. कारण त्यांच्याकडे तसा अधिकार होता.ते स्पष्टवक्ता होते तसेच अत्यंत प्रेमळ होते. संगीतातील कुठल्याही घराण्याबद्दल त्यांना आकस नव्हता. घरंदाज, विशुद्ध गायकीशी तडजोड त्यांना मान्य नव्हती. ते उत्तम रचनाकारही होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांचा दोन दशकाहून जास्त काळ मला सहवास लाभला. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो!
- पं. कमलाकर नाईक (आग्रा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक)

व्यासंगी, विद्वान गायक
पं. दिनकरबुवा पणशीकर हे व्यासंगी विद्वान कलाकार होते. त्यांचे वाचनही दांडगे होते. त्यांच्याशी चर्चा करताना चांगले संदर्भ द्यायचे. त्यांच्याकडून उत्तम विचार ग्रहण करायला मिळायचे. गाण्यातील बंदीस्तपणा त्यांना मानवत नसे. परंपरेशी तडजोड न करता त्यांनी स्वतःची गायन शैली विकसित केली होती. ते उत्तम वागयेकार होते. भाषेचे सौष्ठव त्यांच्याकडे होते.आडा चौतलात शेकडो दर्जेदार बंदिशी रचणे ही काही साधी सुधी किमया नव्हे पण त्यांनी व्यासंगाच्या जोरावर ती करून दाखवली.  महिन्यातून एकदा तरी त्यांचा फोन असायचा आणि नवीन बंदिश केली तर ऐकवायचे. त्यांच्या बोलण्यात नेहमी प्रसन्नता असायची. त्यांच्या सहवासामुळे जुन्या अस्सल परंपरेची झलक अनुभवता आली. त्यांच्या जाण्याने आपल्या शास्त्रीय संगीतातील चालता बोलता इतिहास हरपला आहे. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली.- डॉ. शशांक मक्तेदार (प्राचार्य - गोवा संगीत महाविद्यालयाचे)

तपस्वी घरंदाज गायक हरपला
पुण्यावरून डॉ. मिलिंद मालशे यांच्याकडून फोनवरून पं. दिनकर पणशीकरबुवा यांच्या निधनाची बातमी कळली. मला मोठा धक्का बसला. त्यापूर्वी २५ ऑक्टोबरला डॉ. पतंजली मादुस्कर यांनी मेंदूतील रक्तस्त्रवामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळवले होते. त्यांना गांधर्व महाविद्यालय, वाशी येथे आचार्यपदी विराजमान करण्याचे आम्ही ठरवले होते. पण, दुर्दैवाने त्या आधीच ते आम्हाला मुकले. गांधर्व महाविद्यालय मंडळ परीक्षा समिती आणि शिक्षक परिषद संयोजक यानात्याने मी जयपूर घराण्याच्या तपस्वी गायक तथा गुरूला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना.
- पं. रामराव नायक (बुजूर्ग गायक तथा गुरू व संगीतकार)

संबंधित बातम्या