फातोर्डा: रवींद्र भवन मडगावने जानेवारी २०१५ पासून संघर्ष सन्मान ही व्याख्यानमाला सुरू केली होती, त्यातील प्रथम २२ व्याख्यानांचे ग्रंथाच्या रुपाने छपाई केली होती, पण गेल्या साडेतीन ते चार वर्षे प्रकाशनाच्या प्रतिक्षेत असलेला या ‘संघर्ष सन्मान’ ग्रंथाचे आज भव्यदिव्यरित्या प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्यास मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार मकरंद अनासपुरे तसेच पटकथा लेखक अरविंद जगताप, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर व रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, सदस्य रंजिता पै व अनिल रायकर हे मान्यवर उपस्थित होते.
एखाद्या लहान गोष्टीतून एक महान कार्य होऊ शकते. कुठलीही क्रांती किंवा आंदोलन हे केवळ एका व्यक्तीने सुरू केलेले असते. नंतर त्याला अनेकांचे सहकार्य, पाठिंबा मिळू लागतो. हे सांगताना पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी अनेक समाज सुधारक व सामाजसेवकांची उदाहरणे दिली.
सध्याच्या परिस्थितीत विज्ञान आणि परंपरा यांची सांगड घालणे गरजेचे आहे. पोलिओ, प्लेग किंवा इतर अनेक संशोधने केवळ एकाच माणसाने सुरू केली होती, पण आता त्याचा संपूर्ण जगाला कसा फायदा होतो हे पाहायला मिळते असे जगताप म्हणाले.
सध्या राजकारणात कार्यकर्त्यांपेक्षा चमच्यांची फौज जास्त दिसते. समाजाला निष्ठावंतांची गरज आहे. आता उठसूठ स्वतःची लायकी लक्षात न घेता दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे मार्गदर्शन या शब्दाचा अर्थच बदलून गेल्याचे ते म्हणाले. समाजाला स्वतःची ओळख व्हावी यासाठी जे जे करावे लागते तो ‘संघर्ष’ असे दामू नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले. याप्रसंगी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ व अनिल रायकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
रंजिता पै यांनी सर्वांचे स्वागत केले. दामू नाईक यांनी आभार मानले, तर अनंत अग्नी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संघर्ष सन्मान व्याख्यानमाला आयोजनाला व नंतर छपाई व संपादनाच्या कामाला ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचा गौरव करण्यात आला.
संघर्ष सन्मान हा २४० पानांचा ग्रंथ असून या ग्रंथ व संघर्ष सन्मान व्याख्यानमालेबद्दल श्रीमती सिंधुताई सपकाळ, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, डॉ. विश्र्वास मेहेंदळे, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले आहेत. या ग्रंथात २२ व्याख्यान पुष्पांचा समावेश करण्यात आला आहे.
माणूस परवालंबी बनत चाललाय : मकरंद अनासपुरे
माणूस हा परवालंबी बनत चालला आहे. त्याच्याकडे स्वतः विचार करण्याची शक्ती उरलेली दिसत नाही. सर्व काही तंत्रज्ञान आणि मशिनवर अवलंबून राहिले आहेत. भविष्यात जर माणसाचा मेंदूच काम करेनासा झाला, तर मग परिस्थिती गंभीर रूप धारण करेल, असे अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले. संस्कृती, परंपरा व आपल्या माणसांची ओळख तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. संघर्ष आणि सन्मान हे दोन विरोधाभाशी शब्द आहेत, पण या दोन्ही शब्दांना एकत्र आणण्याचे काम दामू नाईक यांनी रवींद्र भवनतर्फे केले, असेही अनासपुरे म्हणाले.