आंबा उत्पादनाचा आधीच उल्हास, त्यात कोरोनाचा फाल्गुनमास!

The growing cases of corona have raised concerns among mango growers
The growing cases of corona have raised concerns among mango growers

देवगड: एकीकडे आंबा उत्पादन तुलनेत कमी असल्याने बागायतदार चिंतेत आहेत तर दुसरीकडे कोरोनाने अधिक डोकेवर काढल्यास होणाऱ्या कडक निर्बंधांची चिंता बागायतदारांना सतावत आहे. 

यंदाचा आंबा हंगाम समस्यांच्या गर्तेत आहे. या वर्षीचा आंबा हंगाम सुरू झाला असला तरीही त्याला म्हणावा तसा अजून सूर गवसलेला नाही. तुलनेत आंबा उत्पादन कमी झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. 

उत्पादनपूर्वी खर्च आणि मेहनत घेऊनही अपेक्षित फलधारणा झाली नसल्याने बागायतदार काहीसे चिंतेत आहेत. त्यामुळे अजूनही आंबा पिकाचे बाजारातील दर टिकून आहेत. साधारणतः एप्रिल मध्यापासून आंबा हंगाम जोरास येईल, असा काहींचा अंदाज आहे; मात्र असे असले तरीही राज्यात कोरोनाचे सावट गडद होत असल्याने संभाव्य लॉकडउनच्या भीतीने बागायतदारांना चिंता आहे. गतवर्षी लॉकडाउनच्या काळात आंबा विक्री व्यवस्थेमध्ये अनेक अडचणींना बागायतदारांना सामोरे जावे लागले.

आंबा वाहतुकीचा दर निश्‍चित

आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात आंबा ट्रान्स्पोर्टचालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदारांच्यात संयुक्त तातडीच्या झालेल्या सभेत भाडेवाढीबाबत पेटीला ९३ रुपयांचा दर देण्याचे निश्‍चित झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले.

आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात योग्य निर्णय न झाल्याने वाहतूकदारांनी साईमंगल कार्यालयात संप पुकारला होता. सद्यस्थितीत डिझेलचे भाव वाढल्याने प्रतिपेटी वाहतुकीचा खर्च भागत नसल्याने आंबा ट्रान्स्पोर्टचालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदार यांच्या संयुक्त तातडीची बैठक आयन्स्जित करण्यात आली होती. ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांच्या अध्यक्षतेखाली व महासंघाचे पदाधिकारी मनोज वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची बैठक संपन्न झाली. 

यंदाही तसेच वातावरण?
वाशी फळबाजार बंद असल्याने राज्याच्या विविध शहरांमध्ये आंबा नेऊन विकण्याची वेळ बागायतदारांवर आली. यंदाही वातावरण तसेच आहे. गतवर्षी ऐन आंबा हंगामातच कोरोनामुळे लॉकडाउनची समस्या उद्भवली. यंदाही याच काळात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने आंबा हंगामावर त्याचा परिणाम तर होणार नाही ना? अशी चिंता बागायतदारांना लागून राहिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com