सावधान! फोंडा भागातून एकटे जात असाल, तर कृपया काळजी घ्या
The growing number of dogs in Fonda has become a major complication

सावधान! फोंडा भागातून एकटे जात असाल, तर कृपया काळजी घ्या

फोंडा: रात्रीचे जर तुम्ही एकटे चालत किंवा दुचाकीने फोंडा शहर किंवा कुर्टी व ढवळी तसेच लगतच्या भागातून जात असाल, तर कृपया काळजी घ्या... कुत्र्यांची झुंड तुमच्यावर हल्ला करण्याची शक्‍यता असून जीव वाचवण्यासाठी दुचाकी जोरात दामटाल, तर गंभीर अपघात होण्याचाही धोका आहे. त्यामुळे सावध रहा, असे संदेश सध्या फोंडावासीय व लगतच्या नागरिकांना देण्यात येत आहेत. फोंड्यात भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून महिन्याकाठी किमान सत्तर ते ऐशी लोकांना कुत्रे चावण्याचे प्रकार घडत असून हा प्रकार चिंताजनक तर आहेच, पण सरकारी यंत्रणेने त्यावर गंभीरपणे उपाययोजना करण्याची आर्त हाक लोकांकडून ऐकू येत आहे.

फोंड्यात वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे मोठी जटील समस्या बनली आहे. फोंडा शहर तसेच कुर्टी, दुर्गाभाट, तिस्क - फोंडा, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, चिरपुटे आदी भागात कुत्र्यांची झुंड रात्रीच्यावेळी कुणी एकटा दुकटा चालत जात असेल किंवा दुचाकीने जात असेल तर भुंकत त्याच्या मागे लागण्याचा प्रकार सर्रासपणे होत असून कुत्रे मागे लागत असल्याने पळापळीत किंवा दुचाकी वेगाने दामटण्याचे प्रकार घडत असल्याने गंभीर अपघात होत आहेत. खुद्द फोंडा शहरात गेल्या आठवड्यात एका दुचाकीस्वाराच्या मागे कुत्रा लागल्याने या दुचाकीस्वाराने जोरात दुचाकी नेल्याने या कुत्र्याला धडक तर बसलीच, पण दुचाकीस्वाराची धडक वीज खांबाला बसून तो दुचाकीस्वार आणि कुत्रा दोघेही गतप्राण होण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. 

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळाकडे संपर्क साधला असता कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार सातत्याने इस्पितळात नोंद होत असून सरकारी इस्पितळाबरोबरच खाजगी इस्पितळे तसेच दवाखान्यात रॅबिजविरोधी इंजेक्‍शने घेण्याचे प्रमाण बरेच वाढले असल्याने हा प्रकार चिंताजनक ठरला आहे. या कुत्र्यांचा सरकारी यंत्रणेने त्वरित बंदोबस्त करून लोकांना दिलासा द्यावा आणि रात्रीच्यावेळी सुखरुपपणे घरी परतण्यासाठी तरी लोकांना सोयिस्कर करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. 

आयडी इस्पितळात रॅबिजविरोधी लस
कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार फोंड्यात वाढले असून चावे घेतलेले लोक आयडी उपजिल्हा इस्पितळासह खाजगी इस्पितळे व दवाखान्यातूनही रॅबिजविरोधी इंजेक्‍शने घेत आहेत. आयडी उपजिल्हा इस्पितळात ही लस फुकट दिली जाते, तर खाजगी इस्पितळे व दवाखान्यात पैसे मोजून घेतली जाते. गेल्या जानेवारी महिन्यात आयडी इस्पितळातून 21, फेब्रुवारीमध्ये 18, तर मार्चमध्ये 21 व त्यानंतर 10 अशी रॅबिजविरोधी इंजेक्‍शने घेणाऱ्यांची नोंद असून खाजगी इस्पितळ व दवाखान्यात हाच आकडा दुप्पट आहे. विशेष म्हणजे खाजगी डॉक्‍टरकडे लस टोचल्यास किमान 1800 ते 2000 रुपये खर्च करावे लागतात.

जीलान बाशाला फोंड्यात गमवावा लागला जीव...!
फोंड्यातील दादा वैद्य चौकात रात्रीच्यावेळी पेट्रोल पंपवरील ड्युटी संपवून खोलीवर परतणाऱ्या जीलान बाशा नामक इसमाला कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला. दादा वैद्य चौकात जीलान चालवत असलेल्या दुचाकीच्या मागे बेवारशी कुत्रा लागला. घाबरलेल्या जीलानने दुचाकी जोरात दामटली असता कुत्रा दुचाकीच्या समोर आडवा आला. दुचाकीची कुत्र्याला जोरदार धडक तर बसलीच, पण पुढे जाऊन दुचाकी वीज खांबाला धडकली. या प्रकारात जीलानच्या डोक्‍याला गंभीर दुखातप होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कुत्राही तेथेच मरून पडला. एका कुत्र्यामुळे जीलानला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असली तरी असा प्रकार अन्य कुणाच्याही बाबतीत घडू शकतो, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

रात्री बाहेर पडणे ठरतेय धोकादायक
फोंडा शहर तसेच लगतच्या भागात भटकी कुत्री मागे लागत असल्याने रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरले आहे. विशेषतः विविध औद्योगिक वसाहतीत रात्रपाळी संपवून भल्या पहाटे किंवा मध्यरात्री घरी परतणे धोकादायक असून ही भटकी कुत्री मागे लागत असल्याने जीव वाचवण्यासाठी अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे. याशिवाय या भटक्‍या कुत्र्यांनी चावे घेतले आहे, ते वेगळेच.

भटक्‍या कुत्र्यांमुळे रात्री घराबाहेर पडणे मुश्‍किलीचे ठरले असून कळपाने रात्रीच्यावेळी ही कुत्री भुंकत मागे लागत असल्याने अधिकच धोका वाढला आहे. या भटक्‍या कुत्र्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
- जयराज नाईक (नागझर - कुर्टी फोंडा)

काही लोकांचे श्‍वानप्रेम ऊतू जात असून हे लोक या भटक्‍या कुत्र्यांना खाऊ घालत असल्याने या कुत्र्यांना माज आला आहे. आयते खायला मिळत असल्याने ही कुत्री नेमकी रात्रीच्यावेळी लोकांच्या मागे लागतात, या श्‍वानप्रेमींवर आधी कारवाई करायला हवी.
- रंजिता सीमेपुरुषकर (ढवळी - फोंडा)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com