प्राध्यापक विशाल च्‍यारी यांचा मृतदेह सापडला

GU Professor Vishal Chari body found in Paroda
GU Professor Vishal Chari body found in Paroda

सासष्टी: गेल्या चौदा दिवसांपासून अचानक गायब झालेल्या गोवा विद्यापीठातील सहाय्‍यक प्राध्यापक विशाल च्यारी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत गुडी पारोडा येथील चंद्रेश्वर पर्वत परिसरातील जंगलात आज दुपारी आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळखणे कठीण बनले होते. पण, अंगावरील कपडे व अन्य साहित्यावरून विशाल यांची ओळख पटविण्यात आली. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? याची माहिती मिळालेली नाही.

यापूर्वी त्यांची कार गुढी पारोडा परिसरातच सापडली होती. त्यावेळी कारमधील वस्तूंची तपासणी करताना पोलिसांना काही महत्त्‍वाचे धागेदोरे सापडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्या धागेदोऱ्यांच्या सहाय्याने पोलिस आत्महत्येचा गुंता सोडवतील असे दिसते. आजवर च्यारी यांचा शोध पोलिस घेत होते. ते जिवंत सापडतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. त्यामुळे काही महत्त्‍वाची माहिती मिळूनही पोलिसांनी आपले लक्ष च्यारी यांच्या शोधाकडेच लावले होते. ‘च्यारी आधी सापडू द्या नंतर ते गायब होण्याचे कारण उकलू’ अशी पोलिस तपासाची पद्धत असावी असे दिसते. आता च्यारी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिस आता त्यांच्या आत्महत्येच्या कारणांपर्यंत पोचतील का? असा प्रश्‍‍न लोकांकडून उपस्‍थित केला जात आहे.   

पँटच्‍या सहाय्‍याने गळफास घेतलेल्‍या अवस्‍थेत आढळले
सासष्टी: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन आठवड्यांपासून प्राध्यापक विशाल च्‍यारी हे बेपत्ता झाले होते. दोन आठवड्यापूर्वी चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी विशाल यांची चारचाकी आढळून आली होती. त्यानंतर काही दिवसांनी आयआरबी जवानांनी विशाल यांचा शोध घेण्यासाठी जंगल परिसर धुंडाळून काढला होता. 

आज काही स्थानिक कामानिमित्त आत जंगलात गेले असता त्यांना जंगलात दुर्गंधी पसरल्याचे आढळून आले. त्यांनी शोध घेतला असता त्यांना स्वतःच्याच पँटच्या साहाय्याने गळफास घेतलेला मृतदेह सापडला. केपे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवाला.

याप्रकरणी विशाल यांच्या कुटुंबियांशी केलेल्या चौकशीदरम्यान अंगावरील हिरव्या रंगाचे टी शर्ट आणि अन्य साहित्यावरून विशाल यांची ओळख पटली. मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.

विशाल च्‍यारी हे मूळ बोरी येथील रहिवाशी असून सध्या मेरशी येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता आणि ते आणि त्यांची पत्नी मडगाव येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकवत होते, तर नुकतेच विशालची गोवा विद्यापीठात बढती झाली होती. विशाल आणि त्यांची पत्नी गणेश चतुर्थीनिमित्त मूळ घरी जाऊन आले होते. विशाल बेपत्ता झाल्यावर जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार नोंद केलेली आहे.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com