गुळेली आयआयटी प्रकल्पाची बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

सत्तरी येथे होऊ घातलेल्या गोवा आयआयटी प्रकल्पाला गुळेली पंचायतीने ‘ना हरकत दाखला’ नाकारला होता. त्याला प्रकल्पाच्या संचालकांनी आव्हान दिलेला अर्ज अतिरिक्त पंचायत संचालकांसमोर सुनावणीस आज आला असता ही सुनावणी येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

पणजी : गुळेली - सत्तरी येथे होऊ घातलेल्या गोवा आयआयटी प्रकल्पाला गुळेली पंचायतीने ‘ना हरकत दाखला’ नाकारला होता. त्याला प्रकल्पाच्या संचालकांनी आव्हान दिलेला अर्ज अतिरिक्त पंचायत संचालकांसमोर सुनावणीस आज आला असता ही सुनावणी येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली. गुळेली ग्रामस्थांनीही हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे त्यावर अगोदर सुनावणी होणार आहे व त्यानंतर संचालकांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. 

गोवा आयआयटी प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी गुळेली पंचायतीकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर चर्चा होऊन त्याला नकार देण्यात आला होता. स्थानिक ग्रामस्थांचा त्याला विरोध असल्याने पंचायत समितीने एकजुटीने हा अर्ज नाकारण्याचा ठराव घेतला होता. त्यामुळे प्रकल्प संचालकांनी त्याला पंचायत खात्याकडे आव्हान दिले आहे. 

पंचायत खात्याने या अर्जावरील सुनावणी ठेवल्याने प्रकल्प संचालकांतर्फे त्यांचे वकील प्रथमेश तुळस्कर हे उपस्थित होते. गुळेली पंचायतीचे सचिव तसेच गुळेली ग्रामस्थ समितीचे काही पदाधिकारी यावेळी हजर होते. यावेळी प्रकल्प संचालकांच्या वकिलांनी गुळेली ग्रामस्थांच्या हस्तक्षेप अर्जाला विरोध केला. त्यामुळे त्यांना बाजू मांडण्यासाठी वेळ देत अतिरिक्त पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी ही सुनावणी बुधवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पुढे ढकलली. 

गुळेली - सत्तरी येथे होऊ घातलेल्या ‘आयआयटी’ प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी ‘ना हरकत’ दाखला न देण्याचा निर्णय घेण्यास पंचायत समितीच्या सदस्यांवर आयआयटी विरोधक गावकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून एक प्रकारचा दबाव आणून हा निर्णय घेण्यास भाग पाडले होते. ‘आयआयटी’तर्फे एक फाईल ज्यात विशेष करून दहा लाख चौ.मी. जमिनीत संरक्षक भिंत बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. पंचायत आयआयटी प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाला लोकांचा विरोध असल्यामुळे ना हरकत दाखला नाकारण्यात येत असल्याचे पंचायतीने प्रकल्प संचालकांना कळविले होते.

संबंधित बातम्या