गुळेली आयटी प्रकल्पाच्या विरोधात पंचायतीवर हल्लाबोल

Guleli peoples protest against IIT project
Guleli peoples protest against IIT project

गुळेली: गुळेली आयटी प्रकल्पाला विरोधात वातावरण तापत असून, आज (गुरुवारी) सुमारे चारशेच्या आसपास लोकांनी पंचायतीवर हल्लाबोल करत सरपंच व पंच सदस्यांना घेराव घातला. या प्रकल्‍पासंदर्भात पंचायत मंडळाने आपली भूमिका स्‍पष्‍ट करावी, असा आग्रह ग्रामस्‍थांनी धरल्‍याने तणाव निर्माण झाला. ग्रामस्‍थांचा आक्रमक पवित्रा लक्षात आल्‍यावर अखेर दुपारी सरपंच व पंच मंडळींना पोलिस संरक्षणात कार्यालयातून बाहेर पडावे लागले. 

सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी सुमारे दोनशेच्या आसपास मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाओ अभियानतर्फे लोकांनी सरपंच अपूर्वा चारी यांना एक निवेदन सादर केले होते. त्या निवेदनावर ३ सप्टेंबर रोजी आपले म्हणणे मेळावली पंचक्रोशीतील बचाव आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाला देणार असल्याचे सरपंच अपूर्वा चारी यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यादिवशी जमलेले लोक पांगले होते. आज ३ रोजी सरपंच नेमकी कोणती भूमिका घेतात, त्यांचे म्हणणं काय? हे जाणून घेण्‍यासाठी व आयटी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी सुमारे ४०० ग्रामस्‍थ उपस्‍थित होते. त्यात महिला व युवांचा अधिक भरणा होता. ते गुळेली बाजार परिसरात जमले होते. मेळावली प्रकल्‍पाविरोधात लोक सकाळपासून बाजार परिसरात सामाजिक सुरक्षेचे अंतर राखत एकत्र होत होते. सरकारी नियम पाळत आंदोलकांनी ग्रामपंचायतीच्या जवळ न जाण्याचा निर्णय घेतला होता आणि बाजारातच राहणे पसंत केले होते. मेळावली पंचक्रोशी आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर, उप समन्वयक शुभम शिवोलकर, सदस्य नीतेश मेळकर, उन्नती मेळेकर, शंकर नाईक, मिलिंद शिवोलकर यांच्‍यासह अन्‍य काही सदस्‍यांच्‍या शिष्टमंडळाने पंचायत कार्यालयाला भेट दिली. 

यावेळी उपस्थित असलेल्या सरपंच अपूर्वा च्‍यारी व इतर पंच मंडळींनी शिष्टमंडळाला सांगितले की, आम्ही या निवेदनावर पंचायत मंडळ सदस्‍यांत चर्चा केली आहे. आंदोलकांनी केलेल्‍या मागणीनुसार, ते पत्र सहा कार्यालयांना आम्ही पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या वरिष्ठांना हे पाठवणार आहोत. हे पत्र घेण्यास आधी समितींच्या सदस्यांनी नकार दिला. कारण, या पत्रात दिलेले उत्तर हे समाधानकारक नव्हते. 

यावेळी बोलताना समितीतर्फे शुभम शिवोलकर म्हणाले की, ज्या प्रमाणे आम्ही सांगितले होते त्या प्रमाणे पंचायतीने जे काही करायचं होतं ते न केल्यामुळे आमचा हिरमोड झाला आहे. आम्ही त्यांना त्यांच्या लेटरहेडवर हे पत्र छापून पुढे पाठवा, असे सांगितले होते. मात्र, आम्ही दिलेल्या झेरॉक्स प्रतीच आपल्या पत्राला जोडून पंचायत पाठवणार आहे, ते आम्हाला मान्य नाही. कारण या ठिकाणी पंचायतीची व पंचायत समितीची काय भूमिका आहे, हे समजायला वाव नाही. पंचायतीचे काय म्हणणे आहे हे समजणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मेळावलीतील परिस्थितीवर उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर, पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर लक्ष ठेवून होते. कोणताच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनीही पोलिसांना सहकार्य करत रस्ता सोडून आपली निदर्शने चालू ठेवली होती. दरम्यान, संध्याकाळी उशिरा मेळावली येथील प्रकरणामुळे सत्तरीचे उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

...म्हणून नागरिकांचे समाधान झाले नाही
पत्रकारांशी बोलताना सरपंच अपूर्वा च्यारी म्हणाल्या की, ज्याप्रमाणे मेलावली ग्रामस्थांची मागणी केली होती त्याप्रमाणे आम्ही त्याची निवेदने त्या-त्या खात्यांना तसेच आमच्या वरीष्ठांना पाठवणार आहोत. मात्र पंचायतीच्या लेटरहेडवर ते पाठवणे कायद्यात बसत नसल्याने जे काय कायद्यात बसते ते आम्ही केलेले आहे. म्हणून समितीचे जे काही म्हणणे आहे, ते आम्ही आमचे पत्र जोडून पाठवणार आहोत. एकूण आजच्या या सरपंचाच्या उत्तराने आयआयटी विरोधी मेलावळी नागरिकांचे समाधान झाले नाही. समितीच्या शिष्टमंडळाने आधी हे पत्र स्विकारण्यास विरोध दर्शविला परंतु नंतर स्वीकारले.

सरपंचांनी पंचायतीतून बाहेर येण्यास नाकारले
सकाळपासून गुळेली बाजार परिसरात जमलेले लोक एकूण या सरपंचाच्या उत्तराने अधिक चवताळून उठेल व रेव्हल्युशनरी गोवाचे मनोज परब या ठिकाणी उपस्थित होताच हा चारशेच्या आसपासच्या जमावाने थेट पंचायत कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. या ठिकाणी पंचायत व सरपंच यांच्या विरोधात आक्रमक घोषणा दिल्या. यात महिला व युवतींचा अधिक भरणा होता. सरपंचांनीच आम्हाला आपले काय म्हणणे आहे, ते सांगावे असा तगादा उपस्थित जनसमुदायाने लावला होता. परंतु सरपंचांनी पंचायत कार्यालयातून बाहेर येणे नाकारले.

पंचायत मंडळ कार्यालयाबाहेरपडले पोलिस बंदोबस्तात
रेव्हल्युशनरी गोवाचे मनोज परब व इतरांनी सरपंचाची भेट घेऊन एकूण आंदोलन कर्त्यांचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. परंतु सरपंच अपूर्वा च्यारी आपल्या मतावर ठाम राहिल्या. यानंतर मनोज परब यांनी उपस्थित लोकांना सरपंचाचे म्हणणे सांगितले. जोपर्यंत सरपंच अपूर्वा च्यारी बाहेर येऊन लोकांना आपले म्हणणे सांगत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठरवल्यावर दुपारी पोलिसांच्या संरक्षणात सरपंच अपूर्वा च्यारी व इतर पंच सदस्यांना पंचायत कार्यालयातून बाहेर पडावे लागले. यावेळी उपसरपंच नितेश गावडे, पंच विनोद गावकर, पंच अस्मिता मेळेकर, विठ्ठल कासकर, व आयआयटीला सुरवातीपासून विरोध करणारे पंच अर्जुन मेळेकर अपस्थित होते.

बेकायदा जमावप्रकरणी तिघांना अटक
गुळेली-सत्तरी येथे आयआयटी संस्था विरोधात आंदोलन करण्यासाठी बेकायदेशीरपणे जमाबंदी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या रेव्हल्युशनरी गोवा संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी गुरुवारी रात्री वाळपई पोलिसांनी अटक केली आहे. मेळावली गावात होऊ घातलेल्या आयआयटी संस्था विरोधात आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज गुळेली पंचायतीसमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात बेकायदेशीररित्या जमावबंदी करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी या संघटनेचे मनोज परब, विरेश बोरकर व आलेएक्स यांना वाळपई पोलिसांनी अटक केली.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com