डिचोली अर्बन सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी गुरुदत्त संझगिरी

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

उपाध्यक्षपदी आमदार प्रवीण झांट्ये यांची निवड

डिचोली: सहकार क्षेत्रातील एक आघाडीची असलेल्या डिचोली अर्बन सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी गुरुदत्त संझगिरी यांची तर उपाध्यक्षपदी आमदार प्रवीण झांट्ये यांची फेरनिवड झाली आहे. बँकेच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत बँकेचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. 

बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी नूतन संचालक मंडळाची बैठक आज (गुरुवारी) दुपारी ज्येष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष  उमेश झांट्ये यांच्या अध्यक्षतेखाली  बँकेच्या प्रधान कार्यालयात घेण्यात आली. निर्वाचन अधिकारी म्हणून सहकार निबंधक खात्याचे सोनू गावणेकर उपस्थित होते. या बैठकीस नवनिर्वाचित सर्व संचालक उपस्थित होते. अध्यक्षपदी श्री. संझगिरी तर उपाध्यक्षपदी श्री.झांट्ये यांची एकमताने निवड करण्यात आली. 

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेश झांट्ये यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

संचालक मंडळ असे ः गुरुदत्त संझगिरी यांच्या अध्यक्षतेखालील बँकेचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे ः प्रवीण झांट्ये (उपाध्यक्ष), संचालक - उमेश झांट्ये, रोहित झांट्ये, विनायक शिरोडकर, रामचंद्र गर्दे, डॉ. शेखर साळकर, रामानंद नाटेकर, रोहिदास जल्मी, सुदेश नाईक, पल्लवी साळगावकर आणि सुविधा 
कडकडे.

बँक प्रगतीपथावर..!
रिझर्व बँकेचे कडक निर्बंध त्यातच खाणबंदी आणि ''कोविड'' महामारीमुळे बँकांसमोर आव्हाने असली, तरी डिचोली अर्बनची प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. बँकेकडे ५२२.२६ कोटी रुपये ठेवी आहेत. या आर्थिक वर्षात बँकेत २१.७३ कोटी भागभांडवल असून, २.३३ निव्वळ नफा असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष गुरुदत्त संझगिरी आणि उमेश झांट्ये यांनी पत्रकारांना दिली. कर्ज वसुलीही समाधानकारक आहे. भागधारकांचा विश्वास आणि प्रामाणिकपणे सेवा देणारे कर्मचारी यांच्यामूळे बँकेचा कारभार पारदर्शकपणे  चालत आहे. असे श्री. संझगिरी आणि श्री. झांट्ये यांनी स्पष्ट करून संचालक मंडळ बिनविरोध निवडून दिल्याबद्दल भागधारकांना धन्यवाद दिले. बँकेच्या कारभारात संचालक मंडळाचा अनावश्यक हस्तक्षेप होत नाही. असे प्रवीण झांट्ये यांनी स्पष्ट केले. रामचंद्र गर्दे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या