लॉकडाऊनमुळे बेकार कामगारांमार्फंत शिरोड्यात गटारांची स्वच्छता उपक्रम

dainik gomantak
रविवार, 17 मे 2020

मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थलांतरित कामगारांना रहात असलेल्या भागात काम द्यावे असे आवाहन केले होते.

शिरोडा,

कोविड-१९ लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने बेरोजगार झालेल्या कामगारांना घेऊन शिरोडा ग्रामपंचायतीने मॉन्सूनपूर्व गटारे उपसून स्वच्छ करण्याची कामे हाती घेतल्याने नागरिक सरपंच अमित शिरोडकर व त्यांच्या पंच सदस्यांचे कौतुक करत आहेत.
शिरोडा गावात बरेच परप्रांतीय मजूर राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध राहिले नसल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. काही लोकांनी उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी आपल्या गावी परत जाण्याचे ठरवले आहे. परंतु ते बंदमुळे अडकून पडले आहेत. मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थलांतरित कामगारांना रहात असलेल्या भागात काम द्यावे असे आवाहन केले होते. या आवाहनानुसार शिरोडा ग्रामपंचायत पावसाळा सुरू झाल्यावर गावातील अंतर्गत भागातील रस्त्याशेजारची गटारे उपसून स्वच्छ करते. यावेळी या बिगरगोमंतकीयांच्या हातांना काम देत ही गटारे स्वच्छ करण्यात आली. मुख्यमंत्र्याच्या आवाहनानुसार गेल्या दोन दिवसापासून वाजे परिसरातील रस्त्याशेजारची गटारे उपसून स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे बऱ्याच बिगरगोमंतकीय कामगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. गावात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेतल्याबद्दल वाजेचे ग्रामस्थ, पुंडलिक नाईक, गोपाळकृष्ण नाईक, मान्युएल फर्नांडिस, मोहन नाईक, गोविंद नाईक आदींनी पंचायत मंडळाचे कौतुक केले आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना पंचायतीमार्फत मोफत धान्य व अन्य वस्तूंचा पुरवठा केला होता.
शिरोडा गावात राहणाऱ्या स्थलांतरीत कामगारांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. पंचायतीमार्फत त्यांना आवश्‍यक ती मदत पुरविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सरपंच अमित शिरोडकर यांनी सांगितले आहे.

 

संबंधित बातम्या