Virus: एच३एन२’चा संसर्ग; भारतात दोघांचा मृत्यू

आरोग्य विभाग : विषाणूमुळे घाबरू नका
Virus
VirusDainik Gomantak

भारतात ‘एच३एन२’ या हिवतापाच्या विषाणूचा प्रादुर्भावाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सरकारने शुक्रवारी दिली. यातील एकाचा मृत्यू हरियानात झाला असून दुसरी मृत व्यक्ती कर्नाटकमधील आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत महिनाअखेरपर्यंत रुग्णांच्या संख्येत घट होईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

कर्नाटकमधील हासन येथील हिरेगौडा (७८) यांचा ‘एच३एन२’ची लागण होऊन मृत्यू झाला. नव्या विषाणूचा हा देशातील पहिला बळी असल्याचे मानले जात आहे. देशात ‘एच३एन२’ विषाणूची लागण झालेल्या ९० रुग्णांची नोंद झाली आहे.

त्याचबरोबर ‘एच१एन१’चे आठ रुग्णही आढळले आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतात तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. यात प्रामुख्याने ‘एच३एन२’ विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यालाच ‘हाँगकाँग फ्लू’ असेही म्हणतात.

केंद्राच्या सूचना

देशभरातील ‘एच-३ एन-२’ या विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकार देखील सावध झाले आहे. केंद्रीयमंत्री मनसूख मंडाविया यांना राज्यांना सावधगिरीच्या सूचना देत रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

केंद्राने या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली असून हा विषाणू संसर्ग नियंत्रणात राहावा म्हणून सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचे मंडाविया यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी मात्र या विषाणूमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

‘एच३एन२’ची लक्षणे अशी...

खोकला, ताप, थंडी वाजून येणे, श्वास लागणे आणि घरघर आवाज येणे. काही रुग्णांमध्ये मळमळ, घसा खवखवणे, अंगदुखी आणि अतिसार अशी लक्षणेही दिसली आहेत. ही लक्षणे आठवडाभर दिसतात.

मार्च अखेरीस प्रादुर्भाव कमी होणार

या विषाणूचे अस्तित्व जगभरात असते. काही ठराविक महिन्यांत याचे संक्रमण वाढल्याचे दिसते. भारतात दरवर्षी हंगामी हिवतापाच्या संक्रमणाचे दोन हंगाम दिसतात. एक जानेवारी ते मार्च आणि दुसरा मान्सूननंतर असतो.

या हिवतापाचा प्रादुर्भाव मार्चअखेरीस कमी होईल. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी राज्यांमधील निरीक्षण अधिकारी पूर्णपणे सज्ज आहेत, असे आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com