प्रदूषण नियंत्रण मंडळ व जलसंपदा खात्‍याची संयुक्त कारवाई

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

कुंकळ्ळी येथील जलप्रदूषणास कारणीभूत ठरल्याचा संशय असलेली कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील आणखी एक कुपनलिका (बोअरवेल) गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा खात्याच्या पथकाने आज सीलबंद केली.

पणजी:  कुंकळ्ळी येथील जलप्रदूषणास कारणीभूत ठरल्याचा संशय असलेली कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील आणखी एक कुपनलिका (बोअरवेल) गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा खात्याच्या पथकाने आज सीलबंद केली. याआधी याच औद्योगिक वसाहतीतील ९ कुपनलिका १३ नोव्हेंबर रोजी सीलबंद करण्यात आल्या होत्या.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पंचनाम्यातील नोंदीनुसार या तपासणीविरोधात मे. युनायटेड मरीन प्रॉडक्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेच बेकायदा कुपनलिकांची तपासणी करा आणि त्या सीलबंद करा, असा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार आज ही पाहणी केली. 

या कारवाईवेळी केलेल्या पंचनाम्यावर जलसंपदा खात्याचे साहायक अभियंता बी. एस. राजू, तांत्रिक साहाय्‍यक शर्मिला डुरांडो, कनिष्ठ अभियंता  सत्येंद्र फळदेसाई, मंडळाचे कनिष्ठ अभियंता विजय कानसेकर, सेबी फर्नांडिस आणि कंपनीचे प्रतिनिधी सेबेस्तियाव डिसिल्वा यांच्या सह्या आहेत.

कुपनलिका लपविण्‍यासाठी घातले जाडजूड काँक्रिट
१३ नोव्हेंबर रोजी केलेल्या पाहणीत या कंपनीच्या आवारात १० बेकायदा कुपनलिका असून त्यांचा वापर सांडपाणी जमिनीत सोडण्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या कुपनलिकांवर जाडजूड काँक्रिट घातल्याने ते फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला यंत्राचा वापर करावा लागला. आठ मजूर आणि एक यंत्र या साहाय्याने एका कुपनलिकेचे तोंड उघडण्यात मंडळाच्या पथकाला यश आले. ही कुपनलिका १०५ मीटर खोल आहे. त्यात तीन अश्वशक्तीचा पंप सोडण्यात आला होता. त्या कुपनलिकेतून सांडपाण्याचे नमुने घेण्याचा प्रयत्न मंडळाच्या पथकाने केला. मात्र, कुपनलिका सुकल्याने नमुने मिळाले नाहीत. जलसंपदा खात्याच्या पथकाने ही कुपनलिका सीलबंद केली.

संबंधित बातम्या