हरमल पंचक्रोशी हायस्कूलचे आदर्श कार्य

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

हरमल पंचक्रोशी हायस्कूलने अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला. हायस्कूलच्या व्यवस्थापनाने, शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच हायस्कूलने शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे.

कुचेली : हरमल पंचक्रोशी हायस्कूलने अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवला. हायस्कूलच्या व्यवस्थापनाने, शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच हायस्कूलने शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे. टाळेबंदीचा काळ हा सर्वांसाठी वाईट अनुभव ठरला. परंतु तरीही शिक्षकांनी न डगमगता सेवेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात खंड पडू नये, यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. ‘कोविड-१९’मुळे प्रतिकुल परिस्थिती असूनही हायस्कूलचे दहावीचे वर्ग सुरू करून चांगला पायडा घातला आहे. ३८ वर्षांची सेवा दिलेले लक्ष्मण कुबल यांनीही विद्यार्थांना घडविण्याबरोबरच शिक्षण संस्थेचे नाव मोठे करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी संस्थेचा व कुबल यांचा गौव केला.

हरमल पंचक्रोशी हायस्कूलचे सेवानिवृत्तीनिमित्त लक्ष्मण कुबल यांच्यासाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, उदय परब, प्रज्वला सावंत आदी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात रामायण महाभारत परीचय योजना परीक्षेत रामायण विभागात गोवा राज्यात प्रथम आलेली अनुष्का गोसावी हिचा उल्लेख करून तिचे अभिनंदन करण्यात आले. 

महाभारत परीक्षेत हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रमुख पाहुणे पार्सेकर यांच्या हस्ते कुबल यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 

निवृत्त शिक्षक कुबल यांनी हायस्कूलमध्ये आलेले चांगले अनुभव कथन करून शिक्षकांची व विद्यार्थ्यांचे मिळालेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शौनक पै व लेखा नाईक यांनी समयोचित भाषण केले. 
संगीत शिक्षकांनी यावेळी गीत सादर केले. पूजा बांधकर यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा यांनी आभार मानले.
 

संबंधित बातम्या