मालमत्तेच्या वादातून पुतण्यानेच केली मारहाण

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

मालमत्तेच्या वादातून पुतण्याने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या ६० वर्षीय काकीचा पाच दिवसांनी आज मृत्यू होण्याची घटना डिचोलीतील बाये-सुर्ल गावात घडली आहे. जखमी काकीचे आज सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. 

डिचोली: मालमत्तेच्या वादातून पुतण्याने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या ६० वर्षीय काकीचा पाच दिवसांनी आज मृत्यू होण्याची घटना डिचोलीतील बाये-सुर्ल गावात घडली आहे. जखमी काकीचे आज सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. 

निर्मला प्रकाश सामंत असे मारहाणीत मरण पावलेल्या काकीचे नाव आहे. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली पुतण्या वासुदेव श्रीकांत सामंत (वय-२७) या युवकाला अटक केली आहे. यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, मयत निर्मला सामंत ही आपल्या पतीसमवेत बाये-सुर्ल येथील आपल्या भाटातील घरात राहत होती. तर संशयित पुतण्या वासुदेव सामंत हा सोनशी येथे राहत आहे. बाये-सुर्ल येथे असलेल्या मालमत्तेवरुन कुटुंबात वाद सुरु होता.

याच वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, मागील ६ नोव्हेंबर रोजी संशयित वासुदेव सावंत हा बाये-सुर्ल येथे आला. त्यावेळी मालमत्तेवरुन निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. संशयित वासुदेव याने  लाकडाच्या सहाय्याने काकी निर्मला हिला जबर मारहाण केली. या मारहाणीत काकी निर्मला या गंभीर जखमी झाल्या. लागलीच त्यांना साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन गोमेकॉत दाखल करण्यात आले.

मागील पाच दिवसांपासून तिच्यावर गोमेकॉत उपचार चालू होते. मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन मागील रविवारी संशयित वासुदेव सामंत याला अटक करुन दोन दिवसांचा रिमांड घेतला होता. आता काकीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 302 कलमान्वये गुन्हा नोंद करून वासुदेव सामंत याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे

संबंधित बातम्या