गोव्यातील 58 हजार 746 दात्यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आवाहन

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

आजवर राज्यात 58 हजार 746 रुग्ण कोरोनाच्या महामारीतून बरे झाले असले, तरी त्याच्या एक टक्काही नागरिक प्लाझ्मा दानासाठी इस्पितळाकडे फिरकलेले नाहीत.

पणजी: सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारसमोर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रक्त द्रवाच्या (प्लाझ्मा) टंचाईची समस्या उभी ठाकली आहे. आजवर राज्यात 58 हजार 746 रुग्ण कोरोनाच्या महामारीतून बरे झाले असले, तरी त्याच्या एक टक्काही नागरिक प्लाझ्मा दानासाठी इस्पितळाकडे फिरकलेले नाहीत. यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मादानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे, असे आवाहन आता सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर केले जाऊ लागले आहे.(Health Minister Vishwajit Rane appeals to donors to donate plasma)

कोरोना महामारीतून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात 15 दिवसानंतर ॲण्टीबॉडी तयार होतात. त्या कोरोनाशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीराला बळ देतात. यासाठी अशा बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातून रक्तद्रव वेगळा काढून त्याच्यातून अशा ॲण्टीबॉडीज मिळवून त्या रुग्णाच्या शरीरात दिल्या जातात. यामुळे रुग्ण बरा होण्याचे प्रमाण वाढते आणि तो लवकर बरा होतो. जे कोरोना संसर्गित रुग्ण गंभीर स्थितीत आहेत, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी गोमंतकीयांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यासह आरोग्य खात्यानेही केले आहे.

साखळी: नगराध्यक्षांनी ऑफिसला ठोकलं टाळं; नगरपालिकेत हाय होल्टेज ड्रामा

कोरोना संसर्ग झाल्यानंतर नागरिकांचे आरोग्य खालावते आणि त्यांच्या जिवावर संकट येते, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान एक उपयुक्त अशी क्रिया आहे. त्यामुळे प्लाजमाचे दान मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. राज्यामध्ये अठ्ठावण हजाराच्यावर नागरिक कोरोना संसर्गित होऊन बरे झालेले आहेत, अशा नागरिकांनी ते बरे होऊन अडीच महिने ते तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. सध्या गोव्यामध्ये सहा ते सात प्लाझ्माची दिवसाला गरज आहे. मात्र आरोग्य खात्याने अथक प्रयत्न करूनही दिवसाला एक किंवा दोनच व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी येत आहेत.  ही गोव्यासाठी एक गंभीर बाब बणलेली आहे. गोव्यामध्ये कोरोनामुळे होणारे मृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी प्लाझ्मा दान  उपयुक्त ठरत आले आहे. मात्र सध्या प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युची संख्याही काही प्रमाणात वाढल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. 

वारंवार विनंती करूनही नागरिक प्लाझ्मा दान करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्यामुळे शेवटी आरोग्य खात्याने जे नागरिक कोरोना होऊन बरे झालेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा दान करण्याची विनंती करणे सुरू केले असून पुन्हा एकदा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आरोग्य खात्याने नागरिकांना आपला प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे विनंती केलेली आहे.  कोरोना संसर्गीत गोमंतकीयांचे जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान उपयुक्त आहे. त्यासाठी नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान केल्यानंतर कुठलाही त्रास होत नाहीत, याची जाणीव लोकांनी ठेवावी व  प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
प्लाझ्मादात्यांना सुविधा
प्लाझ्मा दान (Plasma Donation) करणाऱ्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Goa Medical College) व इतर सरकारी इस्पितळात आरोग्य उपचारासाठी  प्राधान्य दिले जाते. तसेच  त्यांना रक्ताची गरज पडली तर प्राधान्याने उपलब्ध केले जाते, असे असले तरी प्लाझ्मादानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना समाज माध्यमांवर प्लाझ्माची गरज असल्याची आवाहने करण्याची वेळ आली आहे.

संबंधित बातम्या