कोरोना महामारीमुळे सुनावणीस विलंब 

विलास महाडिक
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

उच्च न्यायालयाने मणिपूर आमदार अपात्रप्रकरणी २० जानेवारी २०२० रोजी आदेश दिला होता. त्यात तीन महिन्यांची मुदत निर्णय घेण्यास दिली होती. याचिकादारांनी आमदार अपात्रता याचिका दाखल केल्यानंतर पाच महिन्यांनी हा निवाडा आला होता.

पणजी

आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बारा आमदारांविरोधात काँग्रेस व मगो पक्षाने सादर केलेल्या याचिका सुनावणीस घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुनावणीमध्ये विलंब झालेला नाही. त्यानंतर कोरोना महामारीमुळे ही सुनावणी घेणे शक्य झाले नव्हते, असे उत्तर सभापती राजेश पाटणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहे. काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर देऊन विरोध केला आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी ११ ऑगस्टला होणार असल्याने त्या १२ आमदारांवर टांगती तलवार आहे. 
मणिपूर प्रकरणात उच्च न्यायालय भारतीय घटनेच्या दहाव्या परिशिष्टातील अर्ध न्यायिक पदाच्या सभापतींना अपात्रता याचिकेवर निश्‍चित वेळेत निर्णय घेण्याचा आदेश देऊ शकते का याबाबत पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने निर्णय घेण्याची गरज आहे. याचिकादाराने आमदार अपात्रतेसंदर्भात याचिका सादर केल्यानंतर पंधरा दिवसांतच ती सुनावणीसाठी घेण्यात आली होती. त्यानंतर उत्तर देण्यासाठी याचिकादार व प्रतिवाद्यांनी मुदत वाढवून घेतल्या होत्या. उच्च न्यायालयाने मणिपूर आमदार अपात्रप्रकरणी २० जानेवारी २०२० रोजी आदेश दिला होता. त्यात तीन महिन्यांची मुदत निर्णय घेण्यास दिली होती. याचिकादारांनी आमदार अपात्रता याचिका दाखल केल्यानंतर पाच महिन्यांनी हा निवाडा आला होता. या निवाड्यानुसार तीन महिन्यांत निकाल देण्याचे नमूद केल्याने ही सुनावणी मार्च २०२० ला घेण्यात आली होती, असे पाटणेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बाजू मांडली आहे. 
राज्यात कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक आमदार कोरोना बाधित झाला असून त्याच्यावर इस्पितळाच उपचार सुरू आहेत. ५ जुलै २०२० रोजी विधानसभा संकुलात ड्युटीवरील एका पोलिस कोरोनाबाधित झाला होता. त्यामुळे पावसाळी अधिवेशन एक दिवसाचे घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत झाला होता. आमदार अपात्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गेल्यावर्षी मे महिन्यात सादर झाली होती. त्यावेळी निश्‍चित वेळेत या याचिकांवर निर्णय घेऊन त्या निकालात काढण्यात येतील असे आश्‍वासन सभापतींतर्फे देण्यात आल्यावर त्या खंडपीठाने फेटाळल्या होत्या. या याचिकांवरील प्रतिवाद्यांना नोटीस बजावून सुनावणी सुरू झाली होती, केंद्राने टाळेबंदी लागू करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे या सुनावणी घेण्यास अडथळे निर्माण झाले होते. 

काँग्रेसमधून नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, आंतोनिओ फर्नांडिस, फ्रांसिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, क्लाफासियो डायस, चंद्रकांत कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्ज व विल्फ्रेड डिसा यांनी भाजपमध्ये तर मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनी मगोतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने संबंधित पक्षातर्फे या आमदार अपात्र याचिका सभापतींसमोर सादर केल्या आहेत. 
 

 
 

संबंधित बातम्या