तिसऱ्या लाटेबद्दलच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी; गोवा सरकार झाले जागे

goa high court.jpg
goa high court.jpg

पणजी: भविष्यात कोरोनाची तिसरी लाट (Third wave of Covid-19) ही मुलांना लक्ष्य करणारी असल्याने त्यासंदर्भात सरकारची (Goa Government) कोणतीच पूर्वतयारी नसल्याबाबतची जनहित याचिका (Public Interest Litigation) गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्यात आल्यावर आरोग्य खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यावर उद्या 24 रोजी सुनावणी आहे. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन आवश्‍यक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. (Hearing today on the public interest petition regarding the third wave of corona)

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बालरोग उपचारासाठी एक वॉर्ड आहे व त्यामध्ये फक्त दहा खाटा ‘आयसीयू’साठी आहेत. ही माहिती जनहित याचिकेत नमूद करण्यात आल्यानंतर सरकार तसेच आरोग्य खात्याचे अधिकारी व डॉक्टर्स कामाला लागले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही यामध्ये लक्ष घालून या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेल्या डॉक्टरांची समिती स्थापन केली व या समितीने पहिल्याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर केला आहे. त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यात वेगळे बालरोग वॉर्ड तसेच मुलांना या कोरोनाच्या साथीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या आहेत. जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारकडून या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेसंदर्भात केलेल्या तयारीची माहिती गोवा खंडपीठात उद्या सादर होण्याची शक्यता आहे.   

आगामी तिसरी लाट गोव्यात येण्यापूर्वी कोणतीच तयारी आरोग्य खात्याने सुरू केलेली नाही. जी अवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी झाली, तिच परिस्थिती या तिसऱ्या लाटेतही उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. इस्पितळात बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. सध्या आधीच डॉक्टरांची कोरोना रुग्ण हाताळण्यासाठी संख्या कमी आहे. कोरोनामुळे बाधित होणाऱ्या मुलांना उपचार देण्यास आवश्‍यक असलेली यंत्रणाही दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना सुरळीत प्राणवायू पुरविण्यात तसेच आवश्‍यक खाटा उपलब्ध करण्यामध्ये सरकारच्या नाकीनऊ आले होते. तीच परिस्थिती येत्या तिसऱ्या लाटेत उद्‍भवू नये, यासाठी सरकारने आवश्‍यक साधनसुविधांची तयारी तसेच या संसर्गाबद्दल ‘आयएमसीआर’ तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारासाठीची माहिती मिळण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले आहेत, त्याची माहिती खंडपीठाने घेऊन निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. 

गेल्यावर्षी मार्च 2020 पासून कोरोना संसर्गाने लोकांचे जीवनमान उद्‍ध्वस्त झाले आहे. कोरोना संसर्गाने पहिल्या लाटेत वृद्धांना लक्ष्य केले होते, तर दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे.

बालरोग वॉर्डात 60 आयसीयू खाटा 
कोरोनाची तिसरी लाट ही मुलांना धोकादायक असल्याने गोमेकॉ इस्पितळातील बालरोग वॉर्डमध्ये पूर्वी असलेल्या 10 आयसीयू खाटांऐवजी आणखी 60 आयसीयू खाटा लवकरच उपलब्ध करण्याचे काम सुरू झाले आहे. या खाटांची संख्या 100 पर्यंत वाढविता येणे शक्य आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. हा संसर्ग पालकांमधून मुलांपर्यंत पोचू शकतो, असा तर्क तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने काढला आहे. त्यामुळे पालकांनाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com