डिचोलीत पावसाचा धुमाकूळ

Tukaram Sawant
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मागील तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर चालूच असून आज मंगळवारी मुसळधार पावसाने डिचोलीत सर्वत्र अक्षरश: धुमाकूळ घालताना बहुतेक सर्व भागाला झोडपून काढले. त्यातच आज दुपारी जोरदार वारे सुटल्याने बहुतेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.

डिचोली
संततधार आणि मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढली असली, तरी सायंकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. डिचोलीसह साखळीतील वाळवंटी नदी ओसंडून वाहत आहे. साळ गावातून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यातच तिळारी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने अतिरिक्‍त पाणी शापोरा नदीत सोडण्यात येत आहे. दुपारी साळ बंधाऱ्यावरील पदपुलाच्या जवळपास पाण्याने पातळी गाठली होती.
पावसाच्या रौद्रावतारामुळे मागील वर्षी साळ गावात आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तरीदेखील सायंकाळपर्यंत परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली होती. दुसऱ्या बाजूने पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज झाली आहे. या यंत्रणेतर्फे आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहर तसेच अन्य भागांतील रस्त्यावर माती केरकचरा वाहून आल्याने चिखलमय स्थिती निर्माण झाली आहे. जनजीवनावरही पूर्णतया परिणाम झाल्याचे जाणवत आहे. पावसामुळे काल रात्रीपासून डिचोली शहरासह बहुतेक भागात वीज समस्या निर्माण झाली आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या