Goa: मान्सून बद्दल महत्वाची बातमी...हवामान खात्याने दिला इशारा

Goa: मान्सून बद्दल महत्वाची बातमी...हवामान खात्याने दिला इशारा
Monsoon News.jpg

पणजी: हवामान (Weather) वेधशाळेच्या अंदाजानुसार आज रविवारी मान्सून (Monsoon) आगमनाच्या दुसऱ्याच दिवशी तुरळक सरींनी हजेरी लावल्यानंतर दिवसभर पावसाने उसंत घेतली. 8 जूनपासून मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून 12 जूनपासून कांही दिवस राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Heavy rains are expected from June 8 in goa)

दरवर्षीप्रमाणे मुहूर्त साधत शनिवारी मान्सूनने राज्यात हजेरी लावली. त्यानंतरचे 48 तास तुरळक सरी वगळता मान्सून उसंत घेईल, अशी शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली होती. त्यानुसार काल 10 वाजण्याच्या सुमारास राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. तासभरच्या बरसातीनंतर आभाळ निष्प्रभ झाल्यामुळे दिवसभर पाऊस झाला नाही. या दरम्यान कांही ठिकाणी मुसळधार पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याच्या घटनाही समोर आल्या. सायंकाळी आभाळ भरून आले होते, पण पाऊस झाला नाही.

पुढील 24 तास पावसाची स्थिती कायम राहणार असून 8 किंवा 9 जून रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच 12 जूनपासून कांही दिवस मान्सून त्याचे रंग दाखविणार आहे. मुसळधार आणि संततधारेची शक्यता असून त्यावर यंदाच्या पावसाची बेगमी अवलंबून असल्याचे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एम.राहुल यांनी गोमन्तकला सांगितले. यंदा राज्यात शेतीपूरक पाऊस होईल, तसेच सरासरी गाठील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्यातरी मान्सूनसाठी वातावरण अनुकूल आहे.

दरम्यान, मॉन्सून वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. रविवारी मॉन्सूनने अलिबाग, सातारा, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. तर बंगालच्या उपसागरावरील शाखेनेही पुढे वाटचाल करत पश्‍चिम बंगालसह, ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यामध्ये मॉन्सून पोहोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. रविवारी संपूर्ण कर्नाटक, तमिळनाडूसह, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, संपूर्ण ईशान्य भारत, पश्‍चिम बंगाल हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
 

शेतकऱ्यांची लगबग
शेतकऱ्यांची मान्सूनची प्रतिक्षा संपली असून शेती कामांना जोर आला आहे. काल शनिवारी मान्सूनच्या आगमनाबरोबर शेतकऱ्यांनी कामांच्या नियोजनाला सुरूवात केली आहे.  काही ठिकाणी कामांना गती आली आहे. पुढील पावसाचा अंदाज घेऊन शेतीकामे वेळेत हातावेगळी करण्याचे आवाहन केंद्रीय कृषी संशोधन संस्थेने केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com