राजधानीत कोरोना रुग्णांची हेकेखोरी

Vilas Ohal
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राजधानी पणजीत कोरोनाच्या बळींचा ‘हॉटस्पॉट’ बनू पाहणाऱ्या आल्तिनो येथील झोपडपट्टीतील कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासन त्यांच्यापुढे हतबल झाल्याचे दिसून आले. त्याठिकाणी राहत असलेल्या इतर २५५ जणांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्‍याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आज दिवसभरात तिघांचे बळी गेले असून, आत्तापर्यंतच्या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८९ झाली आहे, तर ४८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. १६१जण आरोग्य सुधारल्याने घरी परतले आहेत. दरम्‍यान, गुरुवारी पुन्हा एकदा प्रशासकीय अधिकारी त्यांची समजूत काढण्यासाठी जाणार असल्‍याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

विलास ओहाळ

पणजी :

आरोग्य संचालनालयाने माहिती जाहीर केल्यानुसार मांगोरहिल-वास्को येथील ६२ वर्षीय पुरुषाचा, पीर्ण येथील ७४ वर्षी पुरुषाचा मडगावच्या ईएसआय कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. त्याशिवाय बायणा-वास्को येथील ६२ वर्षीय महिलेचा गोमेकॉमध्ये मृत्यू झाला. दिवसभरात ३ हजार ५७५ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या, त्यातील ४८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आयसोलेशन प्रभागात ९४ जणांना ठेवण्यात आले आहे. घरे आणि हॉटेल्समध्ये क्वारंटाईन केलेल्यांची संख्या ८९ आहे.

पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह
तिसवाडी तालुक्यात चिंबल आणि पणजी याठिकाणी दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. पणजीत आज २१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून, त्यातील १२ जण आल्तिनो येथील झोपडपट्टीतील आहेत. त्यात पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजूबाजूच्या परिसरात तिघेजण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याशिवाय कांपाल येथे २, तर मळा, धनलक्ष्मी इमारत, व्हिनस अपार्टमेंट, बोक दी व्हॉक येथे प्रत्येकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. झोपडपट्टी परिसरात २७० लोक राहत असून, त्यातील युवकाचा कोरोनाचा मृत्यू झाल्यानंतर येथे कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्या युवकाच्या मृत्यूनंतर हा भाग ७ ऑगस्टला सील करण्यात आला आहे.

उपमहानिरीक्षकांचे कार्यालय सील
पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांचे पोलिस मुख्यालयातील कार्यालय सील करण्यात आले आहे.

आकडेवारीवर एक नजर
आज घेतलेले एकूण नमुने- ३,५७५
निगेटिव्ह आलेले नमुने - २,५२०
पॉझिटिव्ह आलेले नमुने - ४८०
तपासणी अहवाल प्रलंबित - ५७५
आज घरी परतलेले- १६१
सक्रिय रुग्णसंख्या- ३,१९४
आत्तापर्यंत बरे झालेले - ६,६४१

शंभरापेक्षा जास्त रुग्णसंख्येची ठिकाणे
वास्को..........४०९
मडगाव..........३०९
कुठ्‍ठाळी........२५२
चिंबल...........१७९
फोंडा............१७६
पणजी............१४८
धारबांदोडा.......१३०
वाळपई...........१२१
म्हापसा...........१०७

ईएसआय व फोंडा रुग्णालयात सुविधा
ईएसआय आणि फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आवश्‍यक असणाऱ्या आरोग्य सुविधा उभारण्यात येत असून, त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत सीटी स्कॅन मशिन, कार्डिओग्राम मशिन, ३० एचएफएनओ मशिन्स, एक मोबाईल एक्सरे युनिट, दोन मोबाईल डायलेसिस युनिट, एक अल्ट्रासाऊंड मशिन, दोन ॲबोट ॲटो ॲनालेझर, तसेच रक्तवाहिन्यांचे गुणधर्म तपासणारी हेमॅटोलॉजी मशीन घेण्यात येणार आहेत. या खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याने त्यांचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी समाजमाध्यमाद्वारे आभार मानले आहेत.

केंद्रीय आयुषमंत्री होम क्वारंटाईन
राज्यातील खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्‍याला कोरोनाचा संसर्ग झाल्‍याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. आज दुपारी तीन वाजण्‍याच्या सुमारास त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आल्याने आयसोलेशन म्हणून घरातच ते उपचार करून घेत आहेत. तर त्यांच्या पत्नीलाही ताप आला असून, त्यांचा अहवाल येणे बाकी असले तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याही होम क्वारंटाईन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या