नरकासुराची उंची पाच फुटापेक्षा जास्त नको; महापौरांचे आवाहन

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

दिवाळीसाठी केल्या जाणाऱ्या नरकासुरांना महापालिकेची आडकाठी नाही, पण त्यांची उंची पाच फुटापेक्षा जास्त ठेवू नये. यावर्षी महापालिकेने नरकासूर स्पर्धाही रद्द केली आहे. याविषयी महापालिका लवकरच आपली मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करेल, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी आज दिली.

पणजी : गणेशोत्सवात ज्याप्रमाणे नागरिकांनी केलेले आवाहन पाळले, त्याप्रमाणे येणाऱ्या दिवाळीतसुध्दा नागरिकांनी सहकार्य करावे. दिवाळीसाठी केल्या जाणाऱ्या नरकासुरांना महापालिकेची आडकाठी नाही, पण त्यांची उंची पाच फुटापेक्षा जास्त ठेवू नये. यावर्षी महापालिकेने नरकासूर स्पर्धाही रद्द केली आहे. याविषयी महापालिका लवकरच आपली मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करेल, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी आज दिली.

मडकईकर म्हणाले की, महामारीमुळे सर्व उत्सवावर निर्बंध आले आहेत. महामारीतून बाहेर पडल्यानंतर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करू शकतात. परंतु तोपर्यंत नागरिकांनी धीर धरला पाहिजे. राजधानीतील कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, ही चांगली बाब आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आमदार, डॉक्टर आणि परिचारिका यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे संख्या कमी होत असल्याने त्यांचे आभार मानत ते पुढे म्हणाले की, "अनेक मंडळांकडून आमच्याकडे नरकासूराच्या निर्मितीविषयी विचारणा होत आहे. त्यामुळे आम्ही सध्याच्या महामारीचा काळ पाहता नरकासुरांना आडकाठी आणली नाही, पण त्यांची उंची पाच फुटापेक्षा जास्त असू नये. जी परंपरा चालत आली आहे, ती परंपरा राखली जावी म्हणून आम्ही केवळ नरकासूराची उंची कमी केली आहे. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे मूर्तीच्या उंचीची अट घातली होती, ती अट लोकांनी पाळली होती. त्याशिवाय फटाके वाजविण्यासही बंदी असणार आहे."

महापालिकेच्यावतीने या उत्सवाविषयी एसओपी जाहीर केली जाईल. सध्या एसओपी बनविण्याचे काम सुरू झालेले आहे. ज्यापद्धतीने नरकासूर केले जात होते, ते पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते, तशी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. कारण गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय घेतल्याचे मडकईकर म्हणाले.

संबंधित बातम्या