लॉकडाऊनबाधित घटकांना पाच हजार रुपये द्या

money
money

फोंडा

कोरोनाचे संक्रमण आणि लॉकडाऊन यामुळे छोटे व्यावसायिक आणि छोट्या पगारदारांवर आफत आली असून सरकारने या सर्वांना तातडीची मदत म्हणून सुरवातीला पाच हजार रुपये मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. फोंडा महालातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून या मागणीचा जोर वाढला आहे.
लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वच व्यवहारांवर गदा आली आहे. फक्त सरकारी व बड्या कंपन्यांचे नोकरदार तेवढे सहीसलामत असून इतर छोट्या व छोट्या कंपन्यांच्या कामगारांचे पगार कापण्यात आले आहेत.
नोकरी नाही म्हणून आम्ही स्वयंरोजगार केला, तर आता कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाल्याने रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे खायचे काय, असा सवाल या लोकांनी केला आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर छोटे गाडेवाले, मोटारसायकल पायलट, रिक्षा, टॅक्‍सीवाले, फुलवाले यांची आमदनीच बंद झाली आहे. मंदिरे गेल्या सोमवारपासून खुली होणार होती, पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फोंडा महालातील बड्या देवालयांच्या समित्यांनी एकत्रित बैठक घेऊन मंदिरे अनिश्‍चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या मंदिरांसमोरील गाडेवाले, दुकानदार तसेच फुलविक्रेत्यांची गोची झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करणे आवश्‍यक आहे. मात्र, रोजगार नसल्याने आमचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारनेच आम्हाला मदत करावी, अशी मागणी या लोकांनी केली आहे.
आता पावसाळा सुरू झाल्याने ग्राहकही कमी झाले आहेत. त्यामुळे खायचे वांदे झाल्याचेही या लोकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारने एकंदरीत स्थितीचा त्वरित आढावा घेऊन गरजवंतांना सध्या तरी किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी जोर धरत आहे.

लोकप्रतिनिधींसह काहीजणांची मदत
टाळेबंदीच्या काळात अनेकांवर आर्थिक समस्या ओढवली आहे. विशेषतः परराज्यातील मजूर व कामगार गोव्यात अडकले. फोंड्यात मोठ्या संख्येने अडकलेल्या या मजूर व कामगारांना तालुक्‍यातील सर्वच आमदारांकडून सहाय्य करण्यात आले. याशिवाय गरजू गोमंतकीय कुटुंबियांनाही कडधान्याचे वाटप करण्यात आले. त्यात राजकीय नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील नागरिकांचा तसेच स्वयंसेवी संस्था व देवालय समित्यांचाही मोठा सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com