राज्य विमा महामंडळातर्फे कामगारांना दिला जाणार मदतीचा हात

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

कोविड महामारीमुळे देशभरातील मार्च ते डिसेंबर या दरम्यानच्या काळात नोकरी गेलेल्या कामगारांना कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे (ईएसआयसी) तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५० टक्के रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.

पणजी : कोविड महामारीमुळे देशभरातील मार्च ते डिसेंबर या दरम्यानच्या काळात नोकरी गेलेल्या कामगारांना कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे (ईएसआयसी) तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५० टक्के रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. राज्यात अद्यापि अनेक कामगारांचे यासाठीचे अर्ज प्राप्त होत असून, डिसेंबरनंतर त्यांची छाननी होऊन ती रक्कम अदा केली जाण्याची शक्यता आहे. 

राज्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख कर्मचारी ईएसआय बोर्डाकडे नोंदीत आहेत. त्यातील किती जणांची नोकरी गेली आहे, कितीजण त्या मदतीचे पात्र ठरणार आहेत, हे काम अजूनतरी येथील कार्यालयाकडून सुरू झालेले नाही. पुढील महिन्यानंतर (डिसेंबर) राज्यातील किती नोंदीत कामगारांच्या नोकरीवर गदा आली हे स्पष्ट होईल. अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत कामगारांना हा फायदा मिळवून दिला जाणार आहे. 

बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेतून काही प्रमाणात आर्थिक मदत व्हावी, जी कुटुंबे त्या कामगाराच्या पगारावर अवलंबून होती, त्यांना थोडाफार दिलासा मिळावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. याशिवाय केंद्र सरकारने या योजनेला १ जानेवारी ते ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२०पर्यंत आलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर या टप्प्यातील लाभार्थ्यांना ती रक्कम पुढील वर्षी अदा केली जाण्याची शक्यता असल्याचे येथील कार्यालयातून सांगण्यात आले. परंतु, जर केंद्र सरकारने डिसेंबरमध्येही ही रक्कम वाटपास मंजुरी दिली तर त्याची कार्यवाही पुढील महिन्यापासून करावी लागेल, असे येथील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या