‘हे गोंयकारा पुढे सर, होय आम्ही तयार आहोत...’

सांस्कृतिक प्रतिनिधी
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

हेमा सरदेसाई यांचे गीत लोकार्पण

गायिलेल्या गीतात गोव्याची सुंदरता आहे. आपला गोवा सांभाळण्यासाठीची तळमळ आहे. मी खूप आनंदी झाले हे गीत गाण्यासाठी कारण ते मला माझे वाटले. गोव्याबद्दलच्या माझ्या भावनांशी एकरूप वाटले. हे गोव्याचे राज्य गीत आहे, असे मी म्हणेन व ते प्रत्येक गोमंतकीयाने गायला हवे. यात अनेक व्यक्ती, स्थळे यांचे चित्रीकरण आहे, जे गोव्याच्या मातीशी निगडित आहे. सद्यःस्थितीत सगळे वेगळ्या परिस्थितीतीतून जात आहेत, अशा वेळी हे गीत प्रेरणा देईल.
- हेमा सरदेसाई (गायिका)

पणजी, ता. २० (सांस्कृतिक प्रतिनिधी) ः ‘हे गोंयकारा पुढे सर, होय आम्ही तयार आहोत... एकोप्याने पावले टाक आणि आम्हा सर्वांना एकत्र आण...’ अशा आशयाचे विविधतेतून एकतेचा गजर करणारे आणि गोव्याच्या मातीचा सुगंध असलेले नवे गीत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गोमंतकीय गायिका हेमा सरदेसाई यांनी गायिले असून त्याचे गोवा दिनाच्या निमित्ताने आज (गुरुवारी) लोकार्पण झाले.

‘कोरोना’मुळे परदेशात अडकलेल्या खलाशांना कसे परत आणायचे याचा विचार करत असताना सामाजिक चळवळीतील जीना परेरा हिच्या लक्षात आले की, गोव्यातील अनेकजण, काही गट इथल्या खाण, मोले जंगल, शेती, रस्त्यांची दुर्दशा अशा प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांचे आवाज वेगळे असले तरी ध्येय एकच आहे ते म्हणजे गोव्यावरचे प्रेम. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांनी एका आवाजात, एकात्मभावनेने या भूमीचे गीत गावे यासाठी काही करावे म्हणून जीना हिने प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता रोशन माथाईश यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी नामवंत संगीतकार तथा संगीत निर्माता रायन माथाईश यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले. त्यानंतर रायन यांच्याशी सुमारे आठ तास चर्चा झडली आणि गीतकार येरल पॉल फेर्नांडिस यांच्या सहाय्याने या गीताला जन्म दिला.

या गीतात गोव्याचे पर्यावरण, संस्कृती, बंधुभाव याचे प्रतिबिंब व्हीडिओ स्वरूपात रसिकांसमोर आले आहे. हेमा सरदेसाई यांनी हे गीत जीव 
ओतून गायिले आहे. कारण गोवा, गोंयकारपण व इथल्या सामाजिक प्रश्‍नांवरील चळवळीत त्या स्वतः सहभागी झाल्या आहेत.

केमेरामन लेंझील सुआरिस यांचे चित्रीकरण गीताला पोषक असे आहे. संगीत साथीसाठी ड्रम, गिटार, ट्रम्पेट, सीतार, गिटार, बासरी, मेंडोलीन ही वाद्ये वापरली आहेत. हे गीत लोकप्रियता मिळविल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. कारण या गीतात सामाजिक आशय आहे.

संबंधित बातम्या