दक्षिण गोवा इस्पितळाचे खासगीकरण करण्याचा छुपा अजेंडा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण करण्याचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा कुटील डाव कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतून उघड झाल्याचे सांगून काँग्रेस पक्ष अशा प्रयत्नांना कठोर विरोध करेल, असा इशारा गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

नावेली: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण करण्याचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा कुटील डाव कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतून उघड झाल्याचे सांगून काँग्रेस पक्ष अशा प्रयत्नांना कठोर विरोध करेल, असा इशारा गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

लोकांच्या आजाराचा बाजार करण्याच्या भाजपच्या हीन प्रवृत्तीमुळेच आज कोविड आजारातून बरे झालेले आपला प्लाझ्मा दान करण्यास पुढे येत नाहीत. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना त्यांनी केलेल्या कर्मांबद्दल  विधात्याला उत्तर द्यावेच लागणार आहे हे ध्यानात ठेवावे व तो दिवस जास्त दूर नसल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

आज गोवा सरकार खासगी इस्पितळांना व्हेंटिलेटर, प्लाझ्मा तसेच रेमडेस्विर औषधांचा पुरवठा करीत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगीतले आहे, परंतु खासगी इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांना लाखो रुपयांची बिले फेडावी लागत आहेत. भाजप सरकारने जाणीवपूर्वक खासगी इस्पितळांचे कोविड आजारावरील उपचारांचे दर ठरवून दिलेले नाहीत, जेणेकरून त्यांनी केलेल्या लुटीचा वाटा मंत्र्यांना व भाजपला मिळत राहील, अशी टीका गिरीश चोडणकर यांनी केली.

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी ‘ॲक्ट ऑफ गॉड’ म्हणजे काय असते त्याचा अनुभव कुटील व हेकेखोर राजकारण्यांच्या बाबतीत घेतलेला आहे. सामान्य व गरीब जनतेच्या भावनांशी खेळणारे व निरपराध लोकांना छळणारे यांना ‘देवाची करणी’ काय असते याचा इथेच अनुभव येतो असे सांगून भ्रष्टाचाराने माखलेल्या डॉ. प्रमोद सावंत व विश्वजित राणे यांनl उत्तर मिळणार आहे हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

गोव्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सरकारी व खासगी इस्पितळात जागा शिल्लक नसल्याचे मान्य करणारे आरोग्यमंत्री दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले कोविडसाठी वापरण्यावर भाष्य करण्यास मात्र गप्प राहिले, असे गिरीश चोडणकर म्हणाले.

गोव्यातील भाजप सरकार कोविड महामारी हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असन आज दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारने यापुढे वेळकाढू धोरण अवलंबिल्यास काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या