उच्च न्यायालयाने सुनील गर्ग यांची लोकायुक्तांसमोरील व्यक्तिशः युक्तिवादाची विनंती फेटाळली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

अर्जदार सुनील गर्ग यांच्याविरुद्ध सादर केलेल्या तक्रारीवरील सुनावणीवेळी कोविड महामारीमुळे गोवा लोकायुक्तने त्यांना लेखी बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. व्यक्तिशः युक्तिवाद करण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याविरुद्ध अपिल करून आव्हान दिले होते.

पणजी: लाचप्रकरणी राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्याविरुद्ध गोवा लोकायुक्त समोर सुरू असलेल्या सुनावणीवेळी त्यांच्या वकिलांना बाजू मांडण्यासाठी परवानगी देण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला. 

अर्जदार सुनील गर्ग यांच्याविरुद्ध सादर केलेल्या तक्रारीवरील सुनावणीवेळी कोविड महामारीमुळे गोवा लोकायुक्तने त्यांना लेखी बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. व्यक्तिशः युक्तिवाद करण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याविरुद्ध अपिल करून आव्हान दिले होते. महानिरीक्षक सुनील गर्ग हे सध्या दिल्ली येथे सेवेत आहेत. ते कोविड महामारीमुळे गोव्यात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आभासी पद्धतीने बाजू मांडण्यास परवानगी देण्याचे निर्देश लोकायुक्तला द्यावेत अशी विनंती केली होती. बाजू मांडण्यास संधी न मिळाल्यास त्यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीत वेगळ्या परिणामांना सामोरे जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. 

मुन्नालाल हलवाई याने महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्याविरुद्ध लोकायुक्तसमोर भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे गेल्या पाच वर्षापासून हलवाई हे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. तक्रार दाखल करून घेण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. प्रथमदर्शनी त्यात तथ्य असल्याचे उघड झाले होते मात्र महानिरीक्षक गर्ग हे आयपीएस अधिकारी असल्याने ते गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतात त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी या मंत्रालयाची परवानगी आवश्‍यक असते. त्यासाठी सरकारने परवानगी मागितली होती. मात्र त्यात यश आले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण तेथेच अडकले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या