जिलेटिन स्फोटकेप्रकरणी गोवा खंडपीठाने  स्वप्निल परबला अटकपूर्व जामीन फेटाळला 

dainik gomantak
सोमवार, 22 जून 2020

पेडणे, पर्वरी व फोंडा पोलिस स्थानकातही त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याची पार्श्‍वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला तेव्हा जिलेटिन स्फोटके व वायर्स सापडल्या होत्या त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पणजी

पेडणे पोलिसांनी जिलेटिन स्फोटके सापडल्याप्रकरणी स्वप्निल सखाराम परब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला. अर्जदाराविरुद्ध (संशयित) नोंद केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे व तपासकाम प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याला जामीन देणे योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात केले आहे. 
संशयित स्वप्निल परब याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच जिलेटिन स्फोटके वापरून कासारवर्णे नदीत स्फोट घडवून आणत असल्याचे तपासात पुढे आले आहे. टाळेबंदीच्या काळात जमावबंदी असताना संशयिताने नियमांचे उल्लंघन केले होते त्यामुळे पोलिसात तक्रारी दाखल आहेत. पेडणे, पर्वरी व फोंडा पोलिस स्थानकातही त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याची पार्श्‍वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला तेव्हा जिलेटिन स्फोटके व वायर्स सापडल्या होत्या त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या स्फोटकाचा वापर कशासाठी केला जातो याचे तो स्पष्टीकरण देऊ शकलेला नाही, अशी बाजू सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी मांडली होती. 
अर्जदारतर्फे ॲड. आश्‍विन भोबे यांनी बाजू मांडताना सांगितले की, अर्जदाराच्या घरात कोणतीच जिलेटिन स्फोटके व वायर्स सापडल्या नव्हत्या. त्याला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केल्यास जामीन देण्याचे निर्देश द्यावेत. गोवा खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारणारा आदेश उचलून धरत त्याचा अर्ज फेटाळला. अर्जदाराविरुद्ध हा एकच गुन्हा नाही तर अनेक गुन्हे इतर पोलिस स्थानकातही नोंद आहेत. त्याच्याविरुद्ध नोंद झालेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला अटकपूर्व जामीन याक्षणी देणे योग्य नाही असा निष्कर्ष न्यायालयाने जामीन फेटाळताना काढला आहे. 
 

संबंधित बातम्या