जेनेटो अटकपूर्व जामीन अर्जप्रकरणी  गोवा खंडपीठाची पोलिसांना नोटीस 

विलास महाडिक
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

जुने गोवे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व खुनाच्या आरोपाखाली दोन वेगळे गुन्हे नोंद केले आहेत. या घटनेनंतर अर्जदार जेनेटो कार्दोज याने साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण करून धमकावले होते.

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनेटो कार्दोज याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर केलेल्या याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी झाली. गोवा खंडपीठाने जुने गोवे पोलिसांना बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावून ही सुनावणी सोमवारी (१७ ऑगस्ट) ठेवली आहे. संशयित उच्च न्यायालयात अटकपूर्व अर्ज सादर करू शकतो. मात्र, तो पोलिसांना अजूनही सापडत नाही. 
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर व पोलिसांनी त्याचा शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याने गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर अर्जदार तथा संशयिताच्या इशाऱ्यावरून गुन्हेगारी टोळीने हल्ला केला होता. या टोळीयुद्धावेळी त्याच्याच टोळीतील एकाचा पिस्तुलची गोळी लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व खुनाच्या आरोपाखाली दोन वेगळे गुन्हे नोंद केले आहेत. या घटनेनंतर अर्जदार जेनेटो कार्दोज याने साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण करून धमकावले होते. या प्रकरणाचा गुन्हा पणजी पोलिस स्थानकात नोंद आहे. पणजी पोलिसही त्याच्या शोधात आहेत. 
जुने गोवे पोलिसांनीही त्याच्याविरुद्ध त्याच्या साथीदारानी दिलेल्या जबानीत अनेक पुरावे गोळा केले आहेत व त्याच्या शहानिशा करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची तसेच त्याच्याविरुद्ध अनेक पोलिस स्थानकात गुन्हे नोंद आहेत त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन न देण्याचा युक्तिवाद सत्र न्यायालयात झाला होता त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. 

संबंधित बातम्या