भारनियमन टाळण्यासाठीच ‘तम्नार ते गोवा’ वीज वाहिनीची गरज

दैनिक गोमंतक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

‘तम्नार ते गोवा’ हा उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा प्रकल्प यंदा पूर्ण करणे गरजेचे आहे. तो पूर्ण झाला नाही, तर पुढील वर्षापासून राज्यात ४-६ तास भारनियमन करावे लागणार आहे,

पणजी: ‘तम्नार ते गोवा’ हा उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा प्रकल्प यंदा पूर्ण करणे गरजेचे आहे. तो पूर्ण झाला नाही, तर पुढील वर्षापासून राज्यात ४-६ तास भारनियमन करावे लागणार आहे, कारण वीज टंचाई जाणवणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे नमूद केले. भारतीय जनता महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या जनतेने हे सरकार निवडले आहे. त्यांना सुरळीत आणि पुरेशी वीज पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्याची काळजी मुख्यमंत्री म्हणून मला आहे आणि भाजपचे सरकार आहे, म्हणून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही आहे. राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. ते बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. त्याबाबत विविध माध्यमांवर विरोध असेल तर तेथेच त्याचा प्रतिवाद तेथे कार्यकर्त्यांनी करावा. राज्याच्या विकासाला खीळ पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न  यशस्वी होऊ देता कामा नयेत, असे करणे हेच राज्याच्या हिताचे आहे.

झाडे कापणे, हे आम्हालाही पटत नाही. पण राज्याला वीज आणण्यासाठी वीज वाहिन्या घालाव्यात लागणार आहेत कारण आहे त्या वीज वाहिन्यांची क्षमता संपली आहे. ४०० केव्हीए वीज वाहिन्या घालाव्याच लागणार आहेत. विकास राज्यात झाला पाहिजे तर हे झाले पाहिजे. लोहमार्गाचे दुपदरीकरण हे राष्ट्राच्या हितासाठी आहे. जीवनावश्यक वस्तूंची ने आण करण्यासाठी तो मार्ग आहे. कोळसा वाहतूक सरकार वाढवणार नाही याउलट ती कमी केली 
जाणार आहे. तसे आश्वासन देऊनही आंदोलक समजून घेत नाहीत यावरून त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच आहे हे दिसून येते. राष्ट्रीय महामार्ग आता रुंद केला जात नाही पण काही वर्षांनी त्याची गरज भासणार म्हणून आता पूर्वतयारी करण्यात येत आहे. हे राज्य पुढे नेताना भविष्यात लागणाऱ्या गोष्टींचा आताच विचार करावा लागणार आहे असे ते म्हणाले.

या प्रकल्पांना होणारा विरोध हा राजकीय विरोध आहे. निवडणुका जवळ आल्या की असे विरोध होत असतात. पक्षाची व सरकारची ध्येय धोरणे काय हे महिला कार्यकर्त्यांनी समजून घ्यावीत. त्याविषयी समाजात बोलणे सुरू करावे. म्हणजे जनतेला नेमके सत्य काय ते समजेल असे नमूद करून ते म्हणाले,  स्वयंपूर्ण गोवा करण्याचा सरकारला संकल्प आहे. त्यात महिला कार्यकर्त्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी ही संकल्पना सर्व जनतेपर्यंत पोचवावी. १९१ ग्रामपंचायतींत दर शनिवारी अधिकारी उपस्थित असतात.

गावात एकही व्यक्ती सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. पायाभूत सुविधांसोबत मनुष्यबळ विकास यावरही सरकारने भर दिला आहे. यात सर्वांनी हातभार लावावा. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या