गोव्यातील 'या' भागात कोरोनाचा सर्वाधिक धोका;  जाणून घ्या तुमच्या परिसराबद्दल 

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

राज्यात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. हा संसर्ग आता ग्रामीण भागातही वेगाने पसरलेला दिसत आहे.

पणजी :  राज्यात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. हा संसर्ग आता ग्रामीण भागातही वेगाने पसरलेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेला संसर्ग पाहता गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने  केलेल्या अभ्यासातून ग्रामीण भागात कोरोनाचे हॉटस्पॉट्स तयार झाल्याचे आढळून आले आहे. डिचोली, कुठ्ठाळी, केरी, धारगळ, प्रियोळ आणि शेल्डे हे ग्रामीण भाग कोरोनाचे नवे केंद्र झाल्याचे या अभ्यासातून आढळून आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषधोपचार विभागाने केलेल्या अभ्यासात या भागात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.  (The highest risk of corona is in this part of Goa; Learn about your surroundings) 

Journalist Vaccination: लसी संपत आल्या आणि सरकारला पत्रकार आठवले

तर, राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार,  केरी, धारगळ, पेडणे, शिरदोण, हळदोन, खांडेपार, दोडामार्ग, कुडणे, प्रियोळ, अगोद आणि शेल्डेमधील अधिकाधिक नागरिकांनी कोविड- 19 ची लक्षणे दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, या ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे असलेल्यांचे प्रमाण अधिक असून या भागांमध्ये तपासणीचे प्रमाण वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आरोग्य सेतु अॅपवर ज्यांनी आपली लक्षणे अद्ययावत केली आहेत त्यांच्या आधारे चाचणी घेण्यासाठी आलेल्या संशयित प्रकरणांची तपासणी करण्यात आली. त्या आधारे हा अभ्यास  कोविड -19 प्रकरणांकडून प्राप्त झालेल्या संमिश्र डेटावर आधारित आहे. 

राज्याने प्रत्येक मतदारसंघात 'कोविड-19 वॉर रूम' तयार करण्याची गरज 

प्रतिबंधक आणि सामाजिक औषध विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश ए काकोडकार,  डॉ. नितीन वाय. धुपडाले आणि डॉ. धन्या जोस यांनी आरोग्य सेतु विश्लेषण अॅपवर आलेल्या महितीद्वारे अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर केला आहे. चिंताजनक बाब म्हणजे या हॉटस्पॉट भागात 1 मे रोजी 169 असलेली रुग्णसंख्या 3 मे रोजी 192 वर पोहचली तर त्यानंतर त्या भागात आजपर्यंत 206 पर्यंत रुग्णवाढ झाल्याची माहिती या अभ्यासात आढळून आली आहे.  

 उच्च धोका असलेले  हॉटस्पॉट्स 
उत्तर गोवामध्ये कळंगुट  हा सर्वाधिक धोकादायक भाग झाला आहे. तर, डिचोली, बांबोळी, सांत इनेज आणि पर्वरी या भागातही सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. डाऊन साऊथ, फार्तोडा हे कोरोना संसर्गाचे पहिल्या क्रमांकाचे ठिकाण झाले आहे. तर त्यापाठोपाठ कुडचडे, कुठ्ठाळी, घोगळ आणि नागोवा याठिकानीही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. 

तर दुसरीकडे,  डिचोली औद्योगिक वसाहत हा भागदेखील हॉटस्पॉट म्हणून उदयास आला आहे. अनेक औद्योगिक कामगारांमुळे या भागात विषाणूचा संसर्ग वेगाने पसरला आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरल्याने उत्तर गोवा किनारपट्टीचा भाग अति उच्च जोखमीच्या क्षेत्रातून खाली आला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अशाच एका अहवालात बागा, कळंगुट आणि अंजुना हे गोव्यातील अव्वल हॉटस्पॉट झाले होते.  तर, कोरोना विषाणूच्या या सखालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी उपाययोजना राबवली जात असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. 

संबंधित बातम्या