उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्याचा कुटुंबांचा निर्णय: विश्‍वजित राणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

व्हीआयपी लोक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत, त्यांना दाखल करण्याचा निर्णय हा त्यांच्या कुटुंबांनी घेतला आहे, आम्ही त्यांच्या निर्णयाच्या आड कसे येणार, असे राणे यांनी स्पष्ट केले. 

पणजी: कोरोना झालेले मंत्री, आमदार आणि सरकारी अधिकारी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने समाजमाध्यमांतून सरकारी इस्पितळांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांवर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याविषयी ‘गोमन्तक’ने या प्रकारावर प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी घेतली. 

कोरोनाविरुद्धचा लढा हा आम्ही खासगी रुग्णालयांना बरोबर घेऊन देत आहोत. त्याचबरोबर ज्या व्हीआयपी लोक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत, त्यांना दाखल करण्याचा निर्णय हा त्यांच्या कुटुंबांनी घेतला आहे, आम्ही त्यांच्या निर्णयाच्या आड कसे येणार, असे राणे यांनी स्पष्ट केले. 

आरोग्य संचालनालय व कोरोनाविषयीच्या विविध समितींच्या साप्ताहिक बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. याप्रसंगी आरोग्य संचालनालयाच्या सचिव नीला मोहनन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते. 

‘तो’ निर्णय त्‍यांच्‍या कुटुंबियांचा
राणे म्हणाले की, राज्यात कोरानाविरुद्धचा लढा देण्यासाठी आम्ही खासगी रुग्णालयांना बरोबर घेऊन काम करीत आहोत. राज्यातील काही व्हीआयपी लोकांना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे, ते राज्य सरकारच्या निर्णयाने नव्हे तर तो त्यांच्या कुटुंबांचा निर्णय आहे. ज्या कुटुंबांना जेथे योग्य वाटेल, त्याठिकाणी त्यांनी त्याठिकाणी उपचारासाठी नेले आहे. दोनापावला येथील खासगी रुग्णालयाला आम्ही कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हवी ती मदत करीत आहोत. गोमेकॉमध्‍ये अतिगंभीर रुग्णांसाठी १४५, १४६ आणि १४७ हे वॉर्ड कार्यान्वित झालेले आहेत.

प्लाझ्मासाठी जागृती मोहीम
प्लाझ्मा ही सर्वांत महत्त्वाची बाब असून, अनेकजण तो देण्यासाठी पुढे येत नाहीत. जे कंन्टेन्मेंट झोन आहेत, त्या ठिकाणच्या आमदारांना घेऊन पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाणार आहे. त्यात या झोनमधील बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. आम्ही याविषयी जागृती करणार असून, प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्यांनी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राणे यांनी केले.दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलला प्लाझ्मा घेण्यासाठी मंजुरी आहे. जर त्याविषयी रक्कम आकारली जात असेल तर पुढील आठवड्यात समिती त्यावर निर्णय घेईल. सध्या गोमेकॉकडे २५ पॅक्स असल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या