पेडणे तालुक्याची ऐतिहासिक ओळख

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

उत्तरेकडून गोव्यात प्रवेश करताना प्रथम प्रवेश हा पेडणे तालुक्यातून होतो. त्यामुळे पेडणे तालुका हे राज्याचे प्रवेशद्वार किंवा मुकूट असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पेडणे: उत्तरेकडून गोव्यात प्रवेश करताना प्रथम प्रवेश हा पेडणे तालुक्यातून होतो. त्यामुळे पेडणे तालुका हे राज्याचे प्रवेशद्वार किंवा मुकूट असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पेडणे तालुका हा गोवा राज्याचा तालुका असला तरी या तालुक्याला स्वतःचा वेगळा इतिहास, संस्कृती, स्वतःची भाषा शैली, स्वतःची अशी ओळख आहे.

बांद्यातून गोवाहद्दीत प्रवेश करताना पत्रादेवी येथे रेडी येथून तेरेखोल येथे प्रवेश करताना आरोंदा येथून किरणपाणी-पालये येथे प्रवेश करताना असू द्या किंवा सासोली ह्या महाराष्ट्राच्या हद्दीतून हणखणे इब्रामपूरहून चांदेलद्वारे प्रवेश करताना असू द्या. पोर्तुगीज राजवटीतून गोवा  मुक्त करण्यासाठी देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म पत्करले. गोव्याच्या विविध भागातील आणि पेडणे तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांचा त्याग आणि बलिदानाचा इतिहास सांगायचा झाला तर पोर्तुगीज सत्तेविरुध्द उठाव करणारा पार्से गाव. मोंतेरोसारख्या क्रूर पोर्तुगीज  अधिकाऱ्यांशी लढा देणारे धारगळ व चांदेल, तुये ही क्रांतिकारकांची भूमी.  

भाषा शैली 
पेडणे तालुक्यातील बोली भाषा शैली काही ठरावीक अंतरानंतर बदलते. सीमे जवळच्या भागात मालवणी भाषेचा प्रभाव आहे. तर वास्को किंवा आणखी काही भागात सिंधुदुर्गमधील बरेच लोक राहतात. त्यांची भाषा म्हणजे पेडणे तालुक्यातील लोकांची भाषा अशी बऱ्याच जणांची आणि काही कोकणी- मराठी साहित्यिकांचीही समजूत आहे. पण, ती चुकीची समजूत आहे. पेडण्याची भाषा शैली ही पूर्णपणे वेगळी आहे. पेडण्याच्या भाषा शैलीला स्वतःचा थाट, स्वतःची वेगळी ओळख आहे. या शैलीतील काही शब्द असे आहेत, जे पेडणे तालुक्याचा बाहेर मग ते सिंधुदुर्ग असो कि, राज्याच्या कुठल्या भागात असोत सापडणार नाहीत. पेडण्याच्या शैलीतून अनेक लोकगीते आणि बालगितीतेही आहेत. मात्र, बालगिते विस्मृतीत जात आहे.

देवसू गावची प्रसिद्ध रेती  
बांधकाम क्षेत्रात संपूर्ण राज्यात पेडणे तालुक्यातील रेती प्रसिद्ध आहे. देवसुची रेती ह्या नावाने प्रसिद्ध आहे. बंगल्यांच्या अथवा लहान मोठ्या इमारतीच्या दर्जेदार बांधकामासाठी देवसूच्या रेतीचाच विचार होत आला व अजूनही होतो. जेव्हा कोलवाळ व शिवोली पूल नव्हते तेव्हा फेरी बोट किंवा दोडामार्गहून बांधकामासाठी मुद्दामहून पेडणे तालुक्यातून रेती नेली जायाची. दोन्ही पूल झाल्यानंतर आता रेती थेट नेता येते.
   
पेडण्याच्या गवंडी कलाकारांनी उभारले गोवा राज्य...

चांगल्या सुबक व दर्जेदार बांधकामासाठी पेडणे तालुक्यातील गवंडी कलाकार हे प्रसिद्ध आहेत. संपूर्ण राज्यात गोवा स्वातंत्र्याअगोदर आणि नंतर जे बंगले, इमारती व जुन्या पद्धतीची घरे आहेत, ती पेडणेतील गवंडी कलाकारांनी बांधलेली आहेत. बहुतांश राज्यातील घरे, बंगले व इमारती ह्या पेडण्यातील गवंडी कारागिरांनी बांधून गोवा उभा केला आहे. खुद्द दै. ‘गोमन्तक’ची ‘गोमंतक भवन’ ही इमारत बांधण्यासाठी पेडणे तालुक्यातील गवंडी कारागीर वावरलेले आहेत. दै. ‘गोमन्तक’ची इमारत बांधण्यासाठी आपण वावरलो होतो, हे अभिमानाने पेडण्यातील गवंडी कलाकार सांगत असत. 

प्रसिद्ध दसरोत्सव
पेडणे येथील दसरोत्सव हा संपूर्ण राज्यातील एक मोठा उत्सव आहे. ‘पुनाव’ नावाने या दसरोत्सवाची जास्त ओळख आहे. राज्यात असा दसऱ्याचा उत्सव कुठे होत नाही. घटस्थापनेने या दसरोत्सवाला प्रारंभ होतो. श्री भगवती देवी, श्री रवळनाथ, आदिस्थान अशा तीन मंदिरांबरोबर कोटकरांचं मांगर व अन्य काही मंदिरातून संलग्न असे धार्मिक कार्यक्रम होतात. या काळात रोज श्री भगवती मंदिरात पालखी काढण्यात येते. एकादशीला रवळनाथ मंदिरातून सजविण्यात आलेली रवळनाथ व भुतनाथ देवाची तरंगे मध्यरात्री ढोल ताशांच्या आवाजात भगवती मंदिराकडे येतात. तिथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिवलग्न होते व तरंगे कोटकरांच्या मांगरात येतात. ‘पुनाव’ हा अंतिम सोहळा. या दिवशी राज्य आणि राज्याबाहेरुन आलेल्या लाखो भाविकांची उपस्थिती असते. पहाटे मंदिर नसलेला भुतनाथ वर्षपद्धतीप्रमाणे ‘एका वातीन आनी एका रातीन म्हाका देउळ बांदून जाया’ म्हणून मागणी करतो. भाविकांनी त्याची समजूत काढल्यावर त्याचा मित्र रवळनाथाबरोबर तो माघारी फिरल्यावर हा उत्सव संपतो.

ढोल वादन 
ढोल-ताशा वादन ही एक कला आहे. या कलेलाही शास्त्र आहे. पेडणे येथे दहा बारा दिवस चालणाऱ्या प्रसिद्ध दसरोत्सवावेळी ढोल वादन ऐकताना एका प्रकारची स्फूर्ती येते. 

या ढोल वादन देवांचे तरंगासह एका मंदिरातून दुसऱ्या मंदिराकडे प्रयाण होताना दोन्ही मंदिराच्या मध्यवर्ती पोहचल्यावर, दुसऱ्या मंदिराच्या प्रांगणात पोहचल्यावर, शिव लग्न लागताना भुतनाथ मंदिराची मागणी आणि मंदिराची मागणी पूर्ण होत नाही म्हणून धाव घेतो अशा वेगवेगळ्या प्रसंगी ताशा वाजविणाऱ्या ढोल वादकांना बरोब्बर कलाटणी देतो. त्याद्वारे ढोल की जास्त प्रमाणात वाजतात. पणजीपासून दिल्ली आणि देशात पेडणे येथील या कलाकारांनी शाबासकी मिळविली आहे.

लोक कला   
शिगमोत्सवातून लोक गीते, जती, म्हटल्या जातात. शिगमोत्सवातील सुवारी हा एक प्रकार. मोरजी व पालये येथील घोडे मोडणी हा एक शिगमोत्सवातील प्रसिद्ध प्रकार. थंडीचे दिवस मध्यावर आले असताना धाल्यास प्रारंभ होतो. गावोगावच्या मांडावर वाड्यावरील महिला रात्री एकत्र येवून गोल फिरत लोकगीते म्हणतात तर दोन गट करून जुगलबंदीप्रमाणे लोकगीते म्हणून प्रमाणे एकमेकांना उत्तरे देतात. ख्रिश्चन बंधूंचा सांजावच्या वेळी घुमटांच्या साथीत लोक गीते म्हटली जातात अशा सगळ्या क्षेत्रात पेडणे तालुका संपन्न आहे.

संबंधित बातम्या