गोव्यातील खाणी सुरु करण्यासाठी गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत बैठक ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची उपस्थिती

Home Minister Amit Shah meets C M Dr Pramod Sawant in Delhi to start mining in Goa
Home Minister Amit Shah meets C M Dr Pramod Sawant in Delhi to start mining in Goa

पणजी :  राज्यातील खाणी सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत काल बैठक घेऊन कायदेशीर तोडग्यांच्या विविध शक्यतांवर चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले होते.


या बैठकीत केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी, पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान, आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम सहभागी झाले होते. यापूर्वी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रीगटाची बैठक झाली होती. त्या बैठकीत काही शक्यतांवर विचार करण्यात आला होता. कायदा दुरुस्ती केली तर त्याचा परिणाम देशाच्या इतर भागातील खाणकामावर होता कामा नये यासाठी हा प्रश्न थोडा सावधानतेने हाताळण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.


मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्र सरकारने या प्रश्नी पाठपुराव्याची बैठक घ्यावी यासाठी प्रयत्न चालवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. शहा हे दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चामुळे त्या संदर्भातील बैठकांत दिवसभर होते. त्यामुळे ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत होऊ शकली नव्हती. अखेर रात्री ही बैठक झाली. या बैठकीत कायदेशीररीत्या राज्यातील खाणी कशा सुरू करता येतील. यासाठी १९८७ मध्ये केलेल्या पोर्तुगीज परवाने रद्द करून त्यांचे रूपांतर खाणपट्ट्यांत करण्याच्या कायद्यात योग्य ती दुरुस्ती कशी करता येईल या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. संसदीय व न्यायालयीन मार्गाने खाणींवर शक्य तितक्या लवकर तोडगा  काढण्यावर या बैठकीत एकमत झाले. 


राष्ट्रपती १९ ला गोव्यात?

येत्या १९ डिसेंबरला गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षास सुरवात होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित खास कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित राहावे अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना केली. राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. राष्ट्रपती सचिवालयाने या निमंत्रणाची नोंद घेतली आहे.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com