बार्देशमध्ये घरपोच माटोळी साहित्य

sudesh Arlakar
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त माटोळीचे साहित्य घरपोच करण्याची यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हापसा येथील कार्यकर्त्यांनी उभी केली आहे.

म्हापसा

गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त माटोळीचे साहित्य घरपोच करण्याची यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हापसा येथील कार्यकर्त्यांनी उभी केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना संघाचे म्हापसा येथील कार्यकर्ता संकेत पांडुरंग नाईक म्हणाले, की सध्या टाळेबंदीमुळे बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी; तसेच, कोविडच्या महामारीमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असल्याने माफक दरात माटोळी साहित्य घरपोच देण्याचा हा उपक्रम संघाच्या कार्यकर्त्यांना राबवला आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत मर्यादित ऑर्डर्स स्विकारल्या जातील. बार्देश तालुक्यातील गणेशभक्तांनी १५ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे व त्यासाठी नाममात्र प्रमाणात अर्थांत अठराशे रुपये शुल्क आकारले जाईल.
यासंदर्भात राष्‍्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता संकेत पांडुरंग नाईक, अन्साभाट, म्हापसा (९५४५३२१७७८), तन्वेश दीपक केणी, केणीवाडा, म्हापसा (९९७०७०२१७९) अथवा मंदार नाईक, धुळेर, म्हापसा (९८२२४८९०१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.
हरणं, कांगलं, शेवडं, माट्टुलं, घागरी, कवंडळं, डाळिंब, मोसंबी, सफरचंद, चिकू, अननस, काकडी, तोरिंगण, मक्याचे बोंड, सीताफळ, पेरू, मावळिंग, खायची पन्नास पाने, केळीची पन्नास पाने, बेलपत्र, दुर्वा, उतरवलेले दोन नारळ, मंडोळी केळ्यांचा एक फेण, शिंपटं (सुपाऱ्या), आंब्याचे पंधरा टाळे, ऊस, अळू, कारलं, दोडकं. भेंडी, पंचफळे, काजू मोदक, पूजेचे पूर्ण साहित्य हे साहित्या या संचाअंतर्गत उपालब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, नारळाची पेंड व केळीचा घड अतिरिक्त शुल्क भरल्यानंतर इच्छुकांना उपलब्ध करण्यात येईल, असेही या उपक्रमाच्या संयोजकांनी कळवले आहे.
व्यावसायिक उद्देश ठेवून या उपक्रमाचे आयोजन केलेले नाही, तर सध्याच्या एकंदर सामाजिक परिस्थितीला अनुसरून गणेशभक्तांना दिलासा देण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही संकेत नाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले. अशाच स्वरूपाचे काम वाळपई व डिचोली भागांतही संघाचे अन्य कार्यकर्ते करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Editing  Sanjay ghugretkar

संबंधित बातम्या