हॉटेल कामगार वेतनाविनाच!

dainik gomantak
शनिवार, 16 मे 2020

कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.

पणजी, 

टाळेबंदीमुळे बंद असल्याने निवासी हॉटेलधारक आपल्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांचे वेतनही देऊ शकलेले नाहीत. यात स्थानिक कर्मचाऱ्यांचाही प्रश्‍न असून याची मजूर व रोजगार आयुक्त स्वेच्छा दखल घेणार काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण कामगार पुन्हा नोकरी मिळेल का नाही, याची भीती असल्याने ते तक्रार करण्यास घजावत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांना टाळेबंदीच्या काळातील वेतन देण्याची सर्व कंपनी, आस्थापने व व्यवसायिकांना विनंती केलेली आहे. परंतु ही विनंती अपवादात्मक काहीजण पाळतात. पणजी शहरात अनेक निवासी हॉटेल्स असून त्यात काम करणाऱ्या कामगारांना सध्या विना वेतन बसावे लागले आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक कामगारांचाही मोठा सहभाग आहे. त्या कर्मचाऱ्यांना मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.
सांतिनेज येथील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याने ‘गोमन्तक’कडे आपली कैफियत मांडली. नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर त्याने सांगितले की, आपले दोन महिन्यांचे वेतन अजूनही हॉटेल मालकाने दिले नाही. हॉटेल व्यवस्थापकांना विचारणा केली असता, त्यांनी बँकेत पैसेच नसल्याने तुम्हाला वेतन देऊ शकणार नाही. मालकाकडे कशी विचारणा करायची असाही प्रश्‍न आहे. मजूर व रोजगार आयुक्तांकडे तक्रार करायची झाल्यास नोकरीचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आपल्याप्रमाणे काही कामगारांनाही पगार मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.
बॉम्बे बझारच्या समोरील गेल्या टाळेबंदीच्या दोन महिन्यापूर्वी खुले झालेले मुंबईच्या एका हॉटेलमालकाने उत्तर प्रदेशातील ३० कामगारांना पगाराविना ठेवले आहे. या कामगारांनी गावी जाण्यासाठी आपली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली आहे, पण काहीजणांना त्यांच्या मोबाईलवर सरकारकडून संदेश आला आहे. ते कामगार दररोज उपजिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे घालत असून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी केव्हा रेलगाडी येणार आहे, याची विचारणा करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन मिळाले नसून सध्या त्यांच्याकडील होते तेही पैसे संपत आले आहेत. या कामगारांची सरकार दरबारी अधिकृत नोंदणी न झाल्याने त्यांनाही हॉटेलमध्ये राहता येत असले तरी जेवणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

 

संबंधित बातम्या