हॉटेल्‍स सुरू होणार, पुढे काय..!

तेजश्री कुंभार
रविवार, 31 मे 2020

दरम्‍यान, याबाबत राजधानी पणजीतील हॉटेल व्‍यावसायिकांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. यातील अधिक जणांनी प्रतिक्रिया न देणे पसंत केले.

पणजी, 

राज्‍यातील हॉटेल व्‍यवसाय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठीचा मार्ग आता खुला झाला आहे. मात्र, हा व्‍यवसाय सुरू करताना काही गोष्‍टी कटाक्षाने पाळाव्‍या लागणार आहेत. तसेच दुसऱ्या बाजूने गोव्‍यासारख्‍या पर्यटनक्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. गोव्‍यात हॉटेल व्‍यवसाय खूप व्‍यापक स्‍वरुपाचा आहे. त्‍यामुळे हॉटेलच्‍या माध्‍यमातून जर कोरोनाचा सामुदायिक पातळीवर प्रसार झाला, तर त्‍याला अटकाव घालणे अवघड होणार आहे.
हॉटेल्‍समध्‍ये सामाजिक अंतर पाळण्‍याचा कितीही प्रयत्‍न केला, तरी ते एका पातळीनंतर शक्‍य होत नाही. अशावेळी एक मीटरचे अंतर जरी ठेवण्‍याचा निर्णय हॉटेलचालकांनी दक्षता म्‍हणून घेतला, तर एकावेळी इतक्‍या कमी लोकांना हॉटेलमध्ये सेवा देणे परवडणारे आहे का? चुकून एखादा कोरोनाबाधित नकळतपणे तेथे आला आणि त्‍याला कोरोनाचा संसर्ग झाल्‍याची माहिती नसेल, तर आजवर गोव्‍यात न झालेल्‍या सामुदायिक प्रसाराची दाट शक्‍यता निर्माण होईल. कर्नाटक, महाराष्‍ट्रासह अन्‍य ठिकाणी सुरू असलेल्‍या सामुदायिक प्रसाराबाबतच्‍या उदाहरणांकडे पाहून सामुदायिक प्रसार कसा रोखता येईल, याबाबतही आधीच सावधगिरी बाळगणे आवश्‍‍यक आहे.
दरम्‍यान, याबाबत राजधानी पणजीतील हॉटेल व्‍यावसायिकांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. यातील अधिक जणांनी प्रतिक्रिया न देणे पसंत केले. मात्र, बऱ्याच जणांचा सूर हॉटेल सुरू करण्‍यासाठीचा होता. अनेकांनी कामगार परतले नसल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे हॉटेल्‍स सुरू केली तरी, त्‍या कामगारांना कमी पैशांत अधिक काम करावे लागणार असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. काही हॉटेल व्‍यावसायिक सामाजिक अंतर आणि इतर नियम पाळण्‍यास तयार आहेत. हॉटेलमध्‍ये काम करणाऱ्या कामगारांना या लोकांनी टाळेबंदीच्‍या काळात अन्नपुरवठा केल्‍याची माहिती हॉटेल मालकांनी दिली.

हे करता येऊ शकते...
१. हॉटेलमध्‍ये कितीही गर्दी असली तरी सामाजिक अंतर पाळणे आवश्‍‍यक
२. प्रत्‍येक टेबलवर सॅनिटायझर असावा
३. हॉटेलमध्‍ये येणाऱ्याला मास्‍कची सक्‍ती करावी
४. प्रत्‍येक ग्राहकाचे खाण्‍याचे काम झाल्‍यावर त्‍या टेबलाचे निर्जंतुकीकरण करावे
५. हॉटेलमध्‍ये खाण्‍यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी अपॉईमेंट्‍स फोनवरूनही घेऊन यावे

 

संबंधित बातम्या