मंगेशीत पावसामुळे घर कोसळल्याने तीन मुलांसह वृद्धा बेघर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

या घरात शांता पाटील ही सत्तर वर्षीय वृद्धा तिच्या अन्य दत्तक तीन मुलांसह राहत आहेत. ही सर्व मुले अल्पवयीन असून या महिलेला अन्य कोणताही आर्थिक आधार नाही.

मडकई: वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतक्षेत्रातील हडयेवाडा - मंगेशी येथील एका वृद्धेच्या घराचा काही भाग पावसामुळे कोसळला असून ही वृद्धा बेघर झाली आहे. 

या घरात शांता पाटील ही सत्तर वर्षीय वृद्धा तिच्या अन्य दत्तक तीन मुलांसह राहत आहेत. ही सर्व मुले अल्पवयीन असून या महिलेला अन्य कोणताही आर्थिक आधार नाही. केवळ सरकारचे दोन हजाराचे पेन्शन तेवढे या महिलेला मिळत असून त्या पेन्शनच्या पैशांवरच ही महिला व अल्पवयीन मुले गुजराण करीत आहेत. 

गेल्या आठवड्यात चतुर्थीच्या वेळेला या घराचा काही भाग कोसळला असून अर्धे कोसळलेल्या या घरात राहणे धोकादायक बनले असून उर्वरित भाग कधीही कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे घर फार जुने असून पन्नास ते साठ वर्षे झाली असावीत, असे या वृद्धेने सांगितले.

घराचा भाग कोसळल्यानंतर पंचायतीतर्फे पंचनामा करण्यात आला आहे. मात्र रोजीरोटीचे साधन नसलेल्या आणि राहण्यासाठी अन्य वास्तू नसल्याने या महिलेला सुह्रदांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या