गोव्यातील 'नववर्षा'च्या स्‍वागतावर कोरोनाचे सावट

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

देशभरातील विविध राज्यांत नोंदणी केलेली खासगी वाहने सध्या रस्त्यावर दिसत आहेत. मुखावरण न वापरणे, शारीरिक अंतराचा नियम धाब्यावर बसवणे, यामुळे राज्यात कोविडचा फैलाव नियंत्रणात येत आहे, असे वाटत असताना तो या अनिर्बंधपणे वावरणाऱ्या पर्यटकांमुळे फैलावेल अशी भीती आता स्थानिकांच्या मनात डोकावू लागली आहे.

पणजी :  राज्यात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोविड महामारीच्या अघोषित टाळेबंदीला कंटाळलेल्या भारतीयांचे पाय गोव्‍याकडे वळले आहेत. कोविडच्या भयामुळे स्थानिक घराबाहेर अकारण पडणे पसंत करीत नाहीत. तरीही रस्ते पर्यटकरुपी महासागरांमुळे ओसंडून वाहत आहेत. देशभरातील विविध राज्यांत नोंदणी केलेली खासगी वाहने सध्या रस्त्यावर दिसत आहेत. मुखावरण न वापरणे, शारीरिक अंतराचा नियम धाब्यावर बसवणे, यामुळे राज्यात कोविडचा फैलाव नियंत्रणात येत आहे, असे वाटत असताना तो या अनिर्बंधपणे वावरणाऱ्या पर्यटकांमुळे फैलावेल अशी भीती आता स्थानिकांच्या मनात डोकावू लागली आहे.

 

नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने लोक रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये यासाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये असलेल्या रात्रीच्‍या संचारबंदीमुळे गोव्यात मात्र सारेकाही खुल्लमखुल्ला सुरू आहे. पर्यटकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. पोलिसही केवळ शहरातील वाहनधारक मुखावरणे वापरतात की नाही आणि न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या रुपाने येथे कोविडचा प्रसार झाला तर ते आणखी १०-१२ दिवसांनी समजणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीही असाच कोविडचा प्रसार वाढला होता व नंतर तो समजून आला होता.

 

किनारी भागात पर्यटकांची गर्दी

सध्या किनारी भागात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. कोविड महामारीमुळे पर्यटन क्षेत्राचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पाहणी व मुलाखती यांच्या आधारे सरकारने तसा अहवाल तयार केला आहे. त्या अहवालाचे प्रकाशन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. त्यानंतर आता पर्यटन क्षेत्र उभारी घेऊ लागले आहे. दिवाळीनंतर देशी पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळू लागले आहेत. दिवाळीच्या आठवडाभरात पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी गोव्यात होती. आता नाताळ आणि नव वर्षाच्या निमित्ताने कधी नव्हती एवढी गर्दी वाढली आहे. त्यात नवपरिणीतांचाही समावेश मोठा आहे. दुचाकीवर नव परिणीत जाताना हमखासपणे दृष्टीस पडत आहेत. पर्यटक समुद्रात फसून काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी किनाऱ्यांवरील जीवरक्षक सायंकाळी सहा ऐवजी रात्री ११ वाजेपर्यंत तैनात करण्यात आले असून ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात असतील.

 

दररोज सापडतात सरासरी १०० रुग्‍ण

राज्यात कोरोनाचा फैलाव सध्या आटोक्यात आला आहे. दररोज फक्त शंभरच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. मागील काही दिवसांच्या आकडेवारीवर नजर मारल्यास दिसते की  १८ डिसेंबरला १०४, १९ डिसेंबरला १२७, २० डिसेंबरला ८८,   २१ डिसेंबरला ७९, २२ डिसेंबरला ९६, २३ डिसेंबरला १२५, २४ डिसेंबर ९० रुग्ण सापडले आहेत नववर्षात त्यात वाढ होण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे. पर्यटकांची मोठी गर्दी रस्त्यावर असली तरी स्थानिकांनी मात्र कामापुरतेच घराबाहेर पडण्याचे धोरण अवलंबले आहे. काहींनी गर्दी टाळण्यासाठी कर्नाटकातील दूरवरच्या ठिकाणी जाणे पसंत केल्याचे त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या छायाचित्रांवरून दिसून येते.

 

प्रार्थना सभा ऑनलाईन

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करण्यासाठी मध्यरात्रीच्या ठोक्याला चर्चमध्ये प्रार्थनासभा घेण्यात येतात. यंदा कोविड महामारीमुळे अशा प्रार्थनासभांत भाविक ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. मुख्य प्रार्थना सभेवेळी २५ ते ५० जणांनाच चर्चच्या आकारानुसार प्रवेश देण्यात आला होता. त्यातही नियमित भाविकांना प्राधान्य देण्यात आले. चर्च परिसरात रोषणाई करण्यात आली असून ख्रिस्ती बांधवांनी घर परिसरात गोठे व नाताळ वृक्षही सजवले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह असला तरी चर्चमधील उपस्थितीवर मर्यादा होती त्यामुळे चर्च परिसरात मोठ्या धामधुमीचे वातावरण नव्हते.

 

सरकारी कार्यालयातील उपस्‍थिती रोडावली

हॉटेल रेस्टॉरंट, दुकाने, किनारे गर्दीने फुलून गेले असतानाच सरकारी व निमसरकारी कार्यालयांतील उपस्थिती मात्र रोडावली आहे. शुक्रवारी नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेकांनी बुधवारी व आज गुरुवारी रजा घेणे पसंत केले आहे. अशाने त्यांना सलगपणे चार- पाच दिवस घरी थांबता येत आहे. अनेकांनी फुकट जाणारी किरकोळ रजा संपवण्यासाठी रजा घेतली आहे. रजा घेणाऱ्यांत केवळ खिस्ती धर्मियांचाच समावेश आहे असे नाही. सर्वांनीच रजा घेतलेल्या आहेत. नाताळ सणाचा  उत्साह हा अशा पद्धतीने कार्यालयांतही पोहोचला आहे.

संबंधित बातम्या