बस्तोडा डोंगरावर मानवी सांगाडा सापडला

Dainik Gomantak
मंगळवार, 12 मे 2020

या घटनेसंदर्भात माहिती देताना सरपंच श्री. उसगावकर म्हणाले, जवळच त्या माणसाची कवटी सापडली. त्याची हाडे सर्वत्र पसरलेली होती. त्या अवशेषांच्या बाजूला तसेच जवळपासच्या भागात बॅग, मोबाइल, मोबाइलचा चार्जर, कपडे, पासपोर्ट, आधारकार्ड इत्यादी साहित्य सापडले आहे. आधारपत्रावर व्यक्‍तीचे नाव प्रकाश इन्दवार, जन्मतारीख ७ ऑक्‍टोबर १९८०, रा. पकरा, कामडाग ठाणे, पकरा, गुमला, झारखंड असा उल्लेख आहे.

म्हापसा :

शेळ - बस्तोडा येथील डोंगरावर एका व्यक्‍तीचा सांगाडा तसेच मृतदेहाचे अवशेष सापडले असून, म्हापसा पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहेत. हा मृतदेह पुरुषाचा असून ती व्यक्‍ती मूळची झारखंडमधील असावी, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.
सध्या काजूचा मौसम असल्याने काही व्यक्‍ती काल रविवारी त्या परिसरातील डोंगराळ भागात गेल्यानंतर झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने लटकलेल्या अवस्थेत शर्ट त्यांना दिसला. त्यानंतर त्या लोकांनी आज सोमवारी सकाळी स्थानिक सरपंच रणजित उसगावकर यांना त्यासंदर्भात माहिती दिल्यानंतर श्री. उसगावकर यांनी या घटनेबाबत म्हापसा पोलिसांनी कळवले. म्हापसाचे उपनिरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांच्यासमवेत स्थानिक सरपंचही होते.
या घटनेसंदर्भात माहिती देताना सरपंच श्री. उसगावकर म्हणाले, जवळच त्या माणसाची कवटी सापडली. त्याची हाडे सर्वत्र पसरलेली होती. त्या अवशेषांच्या बाजूला तसेच जवळपासच्या भागात बॅग, मोबाइल, मोबाइलचा चार्जर, कपडे, पासपोर्ट, आधारकार्ड इत्यादी साहित्य सापडले आहे. आधारपत्रावर व्यक्‍तीचे नाव प्रकाश इन्दवार, जन्मतारीख ७ ऑक्‍टोबर १९८०, रा. पकरा, कामडाग ठाणे, पकरा, गुमला, झारखंड असा उल्लेख आहे. हा सांगाडा उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आला आहे.
आत्महत्येचा अथवा घातपाताचा हा प्रकार सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेला असावा आणि जंगली श्‍वापदांनी मृतदेहाचे अवशेष सर्वत्र विखुरले असावेत, अशीही शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

संबंधित बातम्या