स्वातंत्र्याची भुक

पूजा लक्ष्मीकांत भांडारे
रविवार, 16 ऑगस्ट 2020

बाळांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...अरे, मला असे का पाहता आहात? मला ओळखले नाही तुम्ही? अरे हो, मी विसरलेच, तुम्ही मला ओळखणार तरी कसे, माझ्या डोक्यावर असलेल्या ह्या एका मुकुटावरून, नाही, माझी सगळ्यात मोठी ओळखच मी हिरावून बसले आहे रे बाळा.

बाळांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...अरे, मला असे का पाहता आहात? मला ओळखले नाही तुम्ही? अरे हो, मी विसरलेच, तुम्ही मला ओळखणार तरी कसे, माझ्या डोक्यावर असलेल्या ह्या एका मुकुटावरून, नाही, माझी सगळ्यात मोठी ओळखच मी हिरावून बसले आहे रे बाळा. हा आकाशात चढलेला माझा तिरंगा, माझ्या शूरवीर पुत्रांच्या रक्ताने लाल झाला आहे, माझ्या ह्या तिरंगी साडीवर सुध्दा लाल रंगाचाच वर्ख चढला आहे. मी माझे अस्तित्त्व हरवून बसले आहे, मग तुम्ही मला ओळखणार तरी कसे. मी, तुमची सर्वांची भारतमाता, जिला तुम्ही मनापासून प्रिय आहात, आता तरी ओळखलात ना तुमच्या आईला? बाळांनो, आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना हृद्य जड होऊन आले रे, हृदयाच्या ह्या डोहात कित्येक माझ्या अंशांना आजपर्यंत सामावून घेतले आहे मी, ह्या मातीचे व्यक्तिमत्त्व धारण करुन, पूर्वी शत्रूंकडून होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराचा घाव मी सहन केला आहे. काय म्हणालात? माझ्या अंगावरच्या ह्या जखमांचे कारण जाणून घ्यायचे आहे?, आज माझे सारे पुत्र कोरोना विषाणूच्या कोळशांवर चालताना तुमच्या पायांना लागलेले ते चटके, माझ्यावर उमटणार नाही का? तुम्हाला जी वेदना होते, त्याच्या तिप्पटीने तुमच्या भारतमातेला वेदना होतात. तुम्हाला सांगू, एक आई काहीही सहन करु शकते, पण तिच्या बाळाला झालेला प्रत्येक त्रास, तिच्या बाळाच्या मुखातून आलेली ती प्रत्येक वेदनेची किंकाळी त्या आईच्या काळजाचासुध्दा चुरा करुन टाकते रे. तुम्हाला आज ज्या अग्निपरिक्षेतून जावे लागत आहे, त्याच कष्टांचे प्रतिक आहेत मला झालेल्या ह्या जखमा, तुम्हाला सांगु, आजपर्यंत खूप काही मी सहन केले. जीवनअध्यायाच्या प्रत्येक पायरीवर हृदयाला रक्तबंबाळ करणाऱ्या क्षणांना ओंजळीत हींमतीने मी झेलले आहे. माझ्या ह्या रक्ताने माखलेल्या ओटीत माझ्या मुक्ततेकरीता लढलेल्या माझ्या पुत्रांचे मृतदेह धारण केले आहेत मी, आपल्या मातेला मुक्त श्वास घेता यावा, यासाठी जेव्हा माझ्या भूमीवर माझा प्रत्येक बाळ हसता हसता विरगतीला प्राप्त व्हायचा, त्यावेळेस असे वाटायचे जसे त्यांच्यासोबत माझ्या रक्ताचे सहस्त्र थेंब सुकत आहेत, माझे शरीर कोरडे पडत आहे. मी माझ्या वेदनेच्या प्रवाहाला कुणासमक्ष स्वातंत्र्य द्यायचे? भावनांचे काळे ढग नक्कीच दाटून यायचे, असे एकावर एक ढगांचे ढीग निर्माण व्हायचे, पण ते वितळणे तर सोडाच, पण घट्ट पाषाणी बनून अंत:करणात साठून राहायचे. माझ्या मुलांनी अथक् प्रयासांनी माझा सम्मान मला परत मिळवून दिला, माझ्या पुत्रांच्या विरहाच्या दु:खाची छाया आशेच्या उगवत्या सूर्यावर नक्कीच होती, पण उंच आकाशात फडकणारा तो माझा मान, मी स्वतंत्र्य झाल्याचा एक असीम आभास, मला दिलासा देत होता अन् माझ्या पुत्रविरहाच्या कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या माझ्या मातृप्रेमावर गच्च गोधडी घालत होता. आजच्या दिवशी उगवत्या सुर्यासोबत माझ्या भविष्याच्या तेजस्वी सूर्याची चिमुकली किरणे आपल्या मैदानात जमायची, झेडा उंच आकाशात फडकला की त्याला मानाने सलामी देताना सर्व मुलांचा तो राष्ट्रगीताचा गाजलेला एक रम्य स्वर, असे वाटायचे जसे की राष्ट्रगीताच्या पावन शब्दांच्या समुद्रात पुर्ण सृष्टी आंघोळ करत आहे जणू, शत्रूंच्या कैदेतून आपल्या देशाला सोडवण्यासाठी वीरांनी आपल्या छातीवरती सहन केलेले ते सहस्त्र वार, अंगातली प्रत्येक शिर जखमी करून तिच्यावर मिठाच्या राशी ओतताना, त्या धगधगत्या शरीराला बर्फाच्या लादीवरती झोपवताना, माझ्या पुत्रांच्या मुखावर आलेले हे निडर हास्य, आपल्या बोबड्या शब्दांनी ह्या सर्व घटना प्रत्येकाच्या डोळ्यात अन् हृदयात जिवंत करणारी लहान चिमुकली पाखरे किती गोड दिसायची. मुलांनी गायलेली ती देशभक्तीपर गीते ऐकून मनात पूर यायचा, वाटले होते की आता मी सदैव स्वातंत्र्य राहीन, माझी मुले माझे नेहमीच रक्षण करण्यास तत्पर असतील. पण आज तिच माझी मुले हतबल झाली आहेत. आज शत्रू इथे नसूनसुध्दा एका विषाणूच्या शत्रूने माझ्यावर अन् माझ्या मुलांवर आघात केला आहे. दर दिवशी विनाकारण एका विषाणूमुळे कित्येक प्रेते ह्या आईच्या ओटीत पडतात. त्याकाळी मला स्वातंत्र्य देण्याकरीता झटणारी माझी मुलेच आज कोरोना विषाणूच्या कैदेत आहेत. पण मुलांनो, तुमची ही भारतमाता आज तुम्हाला एक गोष्ट सांगु इच्छीते, गुपाट अंधाराच्या रात्रीला एक सूर्य जर पूर्ण प्रकाशमान करु शकतो, तर तुम्ही सर्व माझी मुले नक्कीच कोरोना विषाणूशी झुंज देऊ शकता. बर्फ वितळल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचे पाण्यात रुपांतर होते, त्याप्रमाणे तुम्ही ह्या स्थितीत गोंधळून गेला आहात, स्वत:च्या आत्मविश्वासाला विसरुन, तुम्ही ह्या कोरोनात वितळत आहात, पण अशाप्रकारे वितळून जाणे तुम्हाला अजिबात शोभत नाही. जर वितळला असाल, तर पुन्हा घट्ट बर्फात परिवर्तीत व्हा. कारण वितळल्याने कुठल्या कुठे हरवून जाल, पण जर घट्ट बर्फ बनलात तर ह्या विषाणूची उष्णता तुम्हाला बाधित करु शकणार नाही. आज जे संकट तुम्हा सर्वांवर आले आहे, ज्या कैदेत तुम्ही सापडला आहात, त्या कैदेत सगळीकडे अंधार जरी असला तरीही तुमच्या आत्म्यात भगवंताने तुम्हाला दिलेली बुध्दीची अन् आत्मविश्वासाची मशाल आहे, तुमच्या आत्म्यातली ती विश्वासाची मशाल तुमच्या हाती घ्या अन् कोरोनावर मात करा. मुलांनो, पुढच्या वर्षी पुन्हा सर्व विद्यालयांच्या मैदानात मला तुम्हाला ध्वजारोहणासाठी एकत्र आलेले पहायचे आहे. मनावर ताबा ठेवून आलेल्या ह्या संकटाला दूर फेका. तुम्ही सर्व खूप धाडसी आहात, त्याकाळी माझ्या मुलांना स्वातंत्र्यासाठी आपल्या कुटुंबापासून वर्षानुवर्षे दूर व्हावे लागले होते, दिवस रात्र मोठमोठाली शस्त्रे घेऊन शत्रूंशी अखंड लढा त्यांना द्यावा लागला होता. पण आज जर तुम्हाला कोरोनापासून तुमच्या देशाला वाचवायचे असेल, तर तुम्हा सर्वांना घरात राहून अन् तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन हे युध्द लढायचे आहे. माझ्यासाठी, तुमच्या भारतमातेसाठी न घाबरता कोरोनाविरुध्द लढा देणार ना मुलांनो? तुम्ही ह्या महान देशाची मुले आहात, चहुदिशांनी स्वकर्तृत्त्वाने दरवळणारी सुंदर फूले आहात, ज्या भुमीत मोठमोठाले योध्दा आपला पराक्रम गाजवून गेले, त्याच भूमीत जन्मलेले तुम्ही गोमंतकीय आहात. काळजी घ्या मुलांनो. घरी रहा सुरक्षित रहा.

संबंधित बातम्या